पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांच्यामध्ये एक संघर्ष होता. आपण म्हटलं अर्थवादी आंदोलनन पण आमच्या कार्यकर्त्यांनी मात्र केवळ निःस्वार्थ भावनेने घरादारावर निखारे ठेवून बाहेर पडावं आणि केवळ त्यागातून शेतकरी संघटना तयार करावी असा अर्थवादाशी विसंगत असलेला कार्यक्रम आपण घेतला. जे अर्थवादी नव्हते ते काम उभं राहण्याकरता कार्यकर्त्याला मूठभर धान्याची गरज असते हे मानत होते आणि त्या कार्यकर्त्यांची सोय करत होते. आम्ही अन्नमूलाधाराचं तत्त्वज्ञान मांडत होतो; पण कार्यकर्त्यांनी मात्र अन्नमूलाधारसुद्धा न ठेवता संघटनेच्या कामाला लागावं अशी काहीतरी एक अपेक्षा ठेवली होती. हा संघर्ष कशा तऱ्हेने सोडवता येईल हे मला आज स्पष्ट दिसत आहे.सोडवणं आवश्यक आहे. आजचा नवीन प्रश्न हा आहे.
 गेली दहा वर्षे हा संघर्ष आवश्यक होता हेही मी मानतो. पहिली ठिणगी पाडायची असेल तर गारगोटीच्या घासण्याची आवश्यकता असतेच. एक नवीन विचार मांडायचा होता तेव्हा गारगोटीच्या घासण्याची अशी आवश्यकता होतीच; पण गारगोटीच्या घासण्यातूनच कायमची अशी एक ज्योत तयार होईल अशी अपेक्षा ठेवणंसुद्धा चुकीचं आहे. ठिणगी पाडायचं काम झालं आता वातीचं आणि तेलाचं काम आवश्यक झालेलं आहे. यावेळी पुन्हा गारगोट्या घासून भागायचं नाही. त्याकरिता आता नवीन दिवा तयार करण्याची आवश्यकता आहे आणि तो कसा बनवायचा हा आपल्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे.
 निराशा माझीही झाली आहे. चारपाच वर्षे क्षुद्रवाद विरुद्ध अर्थवाद ही भूमिका मांडत असताना आपण जातीयवादाचा प्रतिकार, त्याला विरोध प्रखरपणे करू शकलो असतो असं वाटत होतं; पण ते शक्य झालं नाही; पण गेल्या ५५ वर्षांच्या आयुष्यात मी आणखी एक गोष्ट शिकलो की जेव्हा आपली निराशा होते, जेव्हा जेव्हा आपण हरतो आणि आपल्याला अपयश येतं तेव्हा तेव्हा तेच अपयश, ती निराशा त्याच्या पुढच्या फार मोठ्या यशाची पायरी ठरते. हे काही केवळ भाषालंकार म्हणून वापरायचं विधान नाही. ज्याला, अपयश का मिळालं याची परीक्षा करून बघण्याची ताकद आहे त्या माणसाच्या बाबतीत अपयश हे त्याला मिळालेलं वरदान आहे.
 आणि तसं मांडलं तर शेवटच्या क्रांत्या, शेवटचा बदल, शेतीमालाला भाव मिळवून घेणे, शेतकरी मनुष्य म्हणून जगू शकणं, त्याला स्वातंत्र्य मिळणं इतका मोठा बदल ज्या उत्पातांतून घडून आला ते उत्पात कोणीही ठरविलेल्या आराखड्यांप्रमाणे कधीही झाले नाहीत. भांडवलशाहीवरचा हल्ला हा ज्या देशांत भांडवलशाही प्रगत झाली होती. त्या देशात म्हणजे जर्मनी किंवा इंग्लंडमध्ये

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ४३