पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संघटनेचे आजपर्यंतचे वैशिष्ट्य आहे, वैभव आहे. परवा असं असं केलं होतं. म्हणून आजही आपण तसंच केलं पहिजे. असं आपण कधी मानलं नाही. प्रशिक्षण असो, शेतकरी संघटक असो, कार्यक्रम असोत ही सगळी साधनं आहेत; मुळातली उद्दिष्टं वेगळी आहेत. आता काय करावं समजत नाही म्हणून जर का आपण कालपरवाप्रमाणेच "चरखे फिरवत सूत कातत" राहिलो तर त्यामुळे संघटनेच्या दहा वर्षांच्या कीर्तीलासुद्धा धक्का लागण्याची शक्यता आहे.
 सतत जागृती, सतत सतर्कता हा शेतकरी संघटनेच्या कार्यपद्धतीमधील आत्मा आहे. संघटनेच्या सटाणा अधिवेशनात आंदोलन पुढं कसं जातं हे स्पष्ट करण्यासाठी मी एक उदाहरण दिलं होतं. डोंगराचा एखादा कडा किंवा कपार चढताना दोन हात आणि दोन पाय या चार अवयवांपैकी तीन पक्के रोवून ठेवायचे आणि चौथ्या अवयवाने, मग तो हात असो, पाय असो, थोडं अजून पुढं जाता येईल अशी एखादी जागा पकडायला मिळते आहे का हे शोधत राहावे लागते. अशी जागा सापडली म्हणजे तेवढंच वर चढून जायचं. पुन्हा दोन हात, दोन पाय यापैकी तीन गोष्टी पक्क्या रोवून चौथ्या अवयवाने आणखी वर जाता येईल अशा जागेचा शोध घेत राहायचे. आंदोलनाची पद्धतीही तशीच असायला हवी अशी मांडणी मी त्यावेळी केली आणि अशी कपार चढत चढत गेल्या दहा वर्षांत आपण बरंच वर चढून आलो आहोत.
 मला वाटतं शेतकऱ्यांच्या समस्येबाबत ज्याला चमत्कार म्हणावं असं काम करण्यात आपण यशस्वी झालो आहोत; पण चमत्कार करून दाखवला आहे असे म्हणून जर का आपण पुढच्या प्रश्नांकडे स्वच्छ, ताजा टवटवीत विचार न करता, गेली दहा वर्षे चांगलं चाललं म्हणून पुढेही दहा वर्षे तोच कार्यक्रम आखून घेतला तर या कड्यावरून कोसळण्याचा फार मोठा धोका आहे. हल्ली शिबिरांमध्ये मी फार कमी वेळ बोलतो, बोललो, तरी फक्त प्रश्नच उभे करतो.
 तेरा वर्षांपूर्वी याच जागी, याच अंगारमळ्यामध्ये अशाच तहेच्या परिस्थितीमध्ये एक पहाड चढून आल्यानंतर दुसरा पहाड चढण्यापूर्वी नकाशा करण्याच्या कामाची मी सुरुवात केली होती. त्यावेळी जमेची एक चांगली गोष्ट होती, की स्वित्झर्लंडमधलं माझं जे काही काम होतं त्याचे सगळे पूल तोडून, त्याच्याशी काहीही संबंध न ठेवता अगदी मोकळेपणाने, स्वतंत्रपणाने इथल्या प्रयोगाला मी सुरुवात केली. त्यावेळी चिंता एकच होती. ती म्हणजे ग्रामीण भागचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला समजले आहेत असं म्हणणारी जी काही हजार दोन हजार माणसं या देशात फिरत होती त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करणे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ४१