पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे, ज्यांना फायदा मिळाला पाहिजे होता त्यांना मिळाला नाही तरी सगळ्या देशातील शेतकऱ्यांकरिता जवळजवळ ४,००० कोटी रुपयांची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली, ही सत्यस्थिती आहे आणि एवढी मोठी मागणी मान्य झाल्याचं, जगातील हे पहिलं उदाहरण असावं; पण किती हजार कोटी रुपये मिळाले याचा हिशोब करून या चळवळीचं मोजमाप होणार नाही. शेतकऱ्यांची एक संघटना तयार झाली आणि त्या संघटनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या विशिष्ट दुखण्याची जाणीव झाली. आपलं दुःखं कशातून उद्भवतात यासंबंधी काही अंदाज आला एवढंच नव्हे तर जाती, धर्म अशा सर्व हीन कल्पना, क्षुद्र कल्पना बाजूला टाकून शेतकऱ्यांची मुलं एकत्र येऊ लागली ही माझ्या दृष्टीनं हजारो कोटी रुपयांहून फार मोठी गोष्ट आहे; उदाहरणार्थ, या प्रशिक्षण शिबिरातसुद्धा तुम्ही काय शिकलात, तुम्हाला काय समजलं, काय नाही यापेक्षाही वेगवेगळ्या तालुक्या-जिल्ह्यातली माणसं केवळ शेतकऱ्यांच्या कामाकरता एकत्र येतात, एकत्र बसतात ही गोष्टच मुळामध्ये फार मोठी गोष्ट आहे; पूर्वी कधी घडली नाही अशी आहे. केवळ शेतकरी संघटनेने घडवून आणलेली ही गोष्ट आहे.
 एकदा प्रश्न समजला की त्याचं उत्तर मिळवणं फारसं कठीण नसतं. प्रश्नच समजला नाही तर काय उत्तर द्यायचं. या गोंधळात काहीतरी गिचमिड लिहिलं जातं. "हिंदुस्थानला स्वातंत्र्य पाहिजे." ही कल्पना केव्हा मान्य झाली? १९३० सालापर्यंत ब्रिटिश साम्राज्यातच राहून बादशहाच्या अंमलाखालीच 'स्वसत्ताक स्थान' (DOMINIAN STATUS) मिळवावं अशी कल्पना होती. संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना १९३० मध्ये मान्य झाली आणि त्यानंतर अवघ्या १७ वर्षांत स्वातंत्र्य मिळालं. त्याचप्रमाणं १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा एक विषय आपण मांडला, ज्यावेळे आधी त्या विषयाला मान्यता नव्हती त्यावेळी मांडला आणि आज दहा वर्षांनंतर त्या विषयाला आणि त्या अनुषंगाने मांडलेल्या विचारसरणीला देशभर मान्यता मिळाली ही काही लहानसहान गोष्ट नाही; पण म्हणून, दहा वर्षांमध्ये यशस्वी झालेल्या या कार्यक्रमाबद्दल निर्माण झालेल्या श्रद्धेमुळे यापुढेसुद्धा तोच कार्यक्रम एखाद्या रूढीप्रमाणे आपण पाळत जायचं आहे असं म्हटलं तर 'शेतकरी संघटने'ला मोठा घोका निर्माण होतो. महात्मा गांधीइतका कार्यक्रमात क्रांतिकारी असलेला दुसरा कुणी मनुष्य नाही; पण स्वातंत्र्य आल्यानंतर गांधीवादाचा नवा अर्थ काय हे समजण्याची कुवत नसलेले शिष्य मिळाल्यामुळे त्यांचे ते शिष्य पंचा नेसण्यामध्ये आणि चरखा फिरवण्यामध्येच धन्यता मानू लागले आणि तिथंच महात्माजींचा पराभव झाला.
 आपण प्रत्येकवेळी स्वच्छ, नवा, ताजा टवटवीत विचार केला हे शेतकरी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ४०