पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निघाला."
 त्याही पलीकडे जाऊन मला एका गोष्टीची फार धन्यता वाटते. १९८० मध्ये शेतकरी आंदोलनाचं वातावरण तयार झालं होतं. ही गोष्ट खरी. उत्पादन वाढवल्यानंसुद्धा तोटाच होतो. अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली. शेतकरी उठावाची अशी आर्थिक व राजकीय परिस्थिती देशात तयार झाली होती. या परिस्थितीत शेतकऱ्यांचं नेतृत्व कुणाकडं जाईल, संभाव्य शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व कुणाकडे जाईल, असा जर प्रश्न विचारला गेला असता तर अशा व्यक्तीच्या अंगी असाव्या लागणाऱ्या गुणांची यादी कशी झाली असती? शेतकरी पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा पाहिजे, शेतीचा अनुभव पाहिजे, चांगलं मराठी बोलणारा पाहिजे, अमक्या जातीचा पाहिजे..., अशी जी यादी झाली असती त्या यादीत जे जे काही गुण घातले गेले असते त्यातला एकही गुण नसलेला मी. त्या माझ्या डोक्यावर ही जबाबदारी आली आणि ती निभावत असता शेतकऱ्यांनी मला अफाट प्रेम दिलं याबद्दल मला धन्यता वाटते.
 त्याहूनही जास्त धन्य धन्य जर मला कधी वाटत असेल तर हा विचार करताना की शेतकऱ्यांचं तर आंदोलन उभं राहिलं, संघटना राहिली; पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये जी काही जागृती शेतकरी संघटनेच्या निमित्ताने आज घडून आली त्याला माझाही थोडाफार हातभार लागला.
 यातून हाती काय आलं? शेतीमालाला भाव आला? नाही. शेतीमालाचा भाव म्हणजे काही घरी यायचा मिठाईचा डबा नाही! उद्या समजा शेतीमालाचा भाव घरी आला तरी तो विनासायास कायमचाच आपल्याला मिळत राहील अशी परिस्थिती कधीही येणार नाही. डोळ्यात तेल घालून सतत जागरुक राहाणं ही स्वातंत्र्याची किमत आहे. ETERNAL VIGILENCE IS THE PRICE OF FREEDOM. जर तुम्ही असं म्हणालात की आता मी स्वतंत्र झालो, आता थोडा आराम करतो तर दुसऱ्या क्षणाला तुमच्या हातातलं स्वातंत्र्य निघून जाईल. शेतीमालाचा भाव ही काही फक्त एकदाच साध्य करायची गोष्ट नाही. शेतीमालाचा भाव हा शेतकरी स्वतंत्र असल्याचा फक्त झेंडा आहे. तो झेंडा तुम्हाला सांभाळायचा असेल तर आज शेतीमालाचा भाव मिळाला म्हणून जर तुम्ही झोपी गेलात तर तो दुसऱ्या क्षणाला तुमच्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सतत जागरुकता ठेवणं हे आवश्यक आहे.
 शेतीमालाला रास्त भाव मिळाला तरी शेतकरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या खिशात किती रुपये जास्त आले याचा हिशोब होईल तेव्हा होवो; पण केवळ कर्जमुक्तीच्या निमित्तानेसुद्धा, आपण कितीही म्हटलं की ही कर्जमुक्ती अपुरी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३९