त्यांच्यातले गुत्ते आपल्याला पहिल्यांदा काढून टाकायचे आहेत आणि इथनं गेल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे, कर्जमुक्तीचे अर्ज भरा म्हणून मी सांगितलं 'तुम्ही भरले' पण पाच लाख भरले, मी दहा लाखाचा आकडा सांगितला होता. हे फार महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्र हे शेतकरी आंदोलनांचे अग्रेसर राज्य आहे. तसं कुठलं एखादं छोटं राज्य, बिहार ओरिसासारखं आकड्यामध्ये कमी पडलं तर चालेल, पण महाराष्ट्रातच आकड्यात कमी पडलं तर कसं काय भागल हो? मीठाचा मिठपणा कमी झाला तर त्याला कशानं खारट करायचं? महाराष्ट्राचा दहा लाख आकडा दिला तर त्याच्यावरून एकसुद्धा कमी होता कामा नये. झालेच तर पंधरा लाख झाले तरी चालतील. काम काही कठीण नाही. पाच लाख लोकांनी अर्ज भरले. दहा लाख अर्ज भरल्याखेरीज तुम्हाला यश मिळवून देण्याची गॅरंटी मी दिलेली नाही. हे लक्षात ठेवा!
आपल्या घरी काही वेळा कार्ड येतात की नाही? वर लिहिलेलं असतं. जय संतोषी माँ प्रसन्न! वगैरे. आणि खाली लिहिलेलं असतं. हे कार्ड पोचताच आणखी सात लोकांना किंवा दहा लोकांना अशीच कार्ड लिहून पाठवा. नाहीतर तुमच्या पोराला काही आजार होईल. असं असतं की नाही कार्ड? तसंच आज तमच्या घरी कार्ड आलं आहे असं समजा. की निदान दोन माणसांचे कर्जमुक्ती अर्ज त्याला पटवून भरून घेतले नाही तर तुमची कर्जातून मुक्तता होण्याची शक्यता नाही. ताबडतोब कामाला लागा, एक मेच्या आधी महाराष्ट्रातील कर्जमुक्तीच्या अर्जाची संख्या दहा लाख झाली पाहिजे.
आणि मग एवढी तयारी झाल्यानंतर आपण बळिराजाच्या पुनरुत्थानाच्या अखेरच्या लढाई करिता तयार होऊ. निवडणुकीत एक गोष्ट महत्त्वाची आहे. खरं म्हणजे मला खूपच आनंद झाला. अधिवेशनामध्ये एकामागोमाग एका कार्यकर्त्यानं काय सांगितले? या राजकारणाच्या चिखलामध्ये आम्हाला फार लडबडायला लावू नका. राज्यकर्ते! कशाला त्यांच्या स्तुत्या करायच्या? गेली बेचाळीस वर्षे यांनी शेतकऱ्यांना लुटलं आणि विरोधी पक्ष? असे कोणते शहाणे लागून गेले? असा कोणता विरोधी पक्ष आहे की ज्याने शेतकरी संघटनेला दुगाण्या झाडल्या नाहीत. असा कोणातच नाही. भारतीय जनता पार्टी शेतकरी संघटनेची कॉपी करून शेतकरी आंदोलनात फूट पाडायला पाहते. राजाराम बापूपासून ते पी.के.अण्णा पाटलापर्यंत आणि मृणाल गोऱ्यांपर्यंत सगळ्यांनी शेतकरी आंदोलनाला कधीना कधी विरोध केलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष तर जाणून बुजून शेतकरी संघटनेला शत्रू नंबर एक म्हणतो. अधिवेशनातील
पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/35
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३५