पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भीती वाटते. सगळ्या शेतकऱ्याकडून असं वातावरण तर होऊ द्या, काय फरक पडेल हो? आज जिथं जिथं जावं, ज्या ज्या कार्यालयात जावं तिथं शेतकरी वाकून वाकून आत जातो. हे आंदालन सहा एप्रिलला चालू झालं की, या गुढीपाडव्यापासून कोणत्याही कचेरीत जाताना प्रत्येक शेतकरी छातीवर बिल्लाआणि मान ताठ असा चालायला लागेल. बळिराजा निम्मा वर आलाच म्हणून समजा.
 त्याच्यानंतर दुसरा एक कार्यक्रम घ्यायचा महत्त्वाचा. याचा सगळा अर्थ तुम्ही समजून घ्या.
 जातीयवाद्यांविरुद्ध लढा द्यायचा आहे. पण हे जातीयवादी कठं असतात हो? साप जसं स्वतःची बिळं करीत नाही, उंदराच्या बिळात घुसतो तसंच जातीयवाद्यांचं आहे. मंदिरात ते तसे क्वचितच सापडतात. जातीयवादी जास्त वेळा दारूच्या अड्ड्यावर आणि मटक्याच्या रक्षणार्थ सापडतात.
 अनेक शेतकरी महिलांनी मला सांगितलं की, "दारूने अनेक शेतकरी परिवार उजाड केले, काही करा; पण गावातील दारू बंद झाली पाहिजे."
 गावागावामध्ये दारूचे अड्डे, महिलांनी निरोधने करून बंद पाडावीत. हे लक्षात घ्या, दारू पिणे न पिणे याकरिता हा कार्यक्रम नाही. कणाची कदाचित चुकीची समजूत होईल. मग कशाकरिता करायचे? हे दारूचे अड्डे, दारूचे अड्डे नाहीत. ते पुढाऱ्यांचे आणि गुंडांचे, जातीयवाद्यांचे अड्डे आहेत. म्हणून त्यांना पहिल्यांदा बंद पाडायचं. आज बहुतेक आमदार विधानसभेमध्ये कशाकरिता भांडतात? तर बॅरिस्टर अंतुल्यांपासून सगळ्या मुख्यमंत्र्यांनी एक एक आमदाराच्या मागे दोन दोन, चार-चार गुत्ते काढून दिले. त्या गुत्त्याच्या पैशावर आमदार मिजास मारून राहिले. त्यांच्या गळ्याला हात घालायचा असेल तर तो गुत्ता उठता बसता बंद करा.
 दहा एप्रिलपासून मी स्वतः महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांची आधिवेशने घेणार आहे. विद्यार्थ्यांची अधिवेशन घेणार आहे आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. कशाकरिता? मे महिन्याची तयारी, आपली तयारी जय्यत पाहिजे. फौजेची तयारी जय्यत पाहिजे.
 तुम्हाला काय काय कामं सांगितली? घरी जायचं. गावं रंगवून घ्यायची. गावाच्या बाहेर बिल्ला लावायचा. पाटी लावून टाकायची 'जातीयवाद्यांना गावात प्रवेश नाही'. सहा एप्रिलपासून, पाडव्याच्या दिवसापासून भ्रष्टाचारविरोधी मोहीम चालू करा. एक मे पासून गावामध्ये, बाजारपेठेतल्या या गुत्त्यांना इतक्यात हात लावू नका, आपण थोडं नंतर बघू ते; पण बाजारपेठ नसलेली गावे आहेत.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३४