पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कार्यकर्त्यांनी म्हटलं, "शरदराव, कृपा करा आणि आम्हाला विरोधी पक्षांचा प्रचार करण्याकरिता थकवू नका, दुसरं काही सांगा." ठीक आहे म्हटलं. शक्यतो तुम्हाला थकवणार नाही, कारण मला असं दिसतंय १९८९-९० ची लढाई कोणी जिंको कोणी हरो शेतकरी संघटनेने ही लढाई आधीच जिंकलेली आहे.
 सगळी वर्तमानपत्रं म्हणतात की, बहुतेक लोकसभेच्या जागा २८०-२६० अशा वाटल्या जातील. २८०-२६० म्हणजे काय हो? मग आता आपण सुरक्षित झालो. एकाच्या हाती चारशे जागा गेल्या, तर मग आपण धोक्यात आहोत. २८०-२६० वाटपात सामान्य, सज्जन, चांगला प्रामाणिक मनुष्य जगू शकतो. तेव्हा आपण जिंकलेलोच आहोत. पण लढायचं झालं तर काय करायचं? मलाही असं वाटतं, या विरोधी पक्ष आणि त्यांची ती रोजची भांडणं! आणि दिल्लीवरनं कोण काय बोलतो? आणि मद्रासमधनं कोण काय बोलतो? यांच्याकरिता धावायला खरंच माझंसुद्धा-मी लाऊडस्पिकर समोर उभा राहिलो तरीसुद्धा माझ्यातोंडातनं त्यांच्याकरिता भाषण करायला शब्द फटायचा नाही.
 त्यांच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी सुचवलं ते असं. आपण जिल्हा परिषदेला ठरवलंच होतं की नाही, की महिला आघाडींनी आपलं शंभर टक्के महिलांचे पॅनेल उभं करावं आणि ते काम किती कठीण होतं? जवळपास दोन हजार उमेदवार शोधून काढायचे होते. हे काम तर फार सोपं. या अधिवेशनानं महिला आघाडीला विनंती केली की, तुम्ही काहीतरी करा. या विरोधकांकरिता धावण्यापेक्षा आमच्या आया-बहिणींनी जर ठरवलं तर, निरक्षर असू द्या, अंगठे बहाद्दर असू द्या पण निदान डांबरट तर नाही ना त्या? तुम्ही ज्या कोणत्या माय-बहिणीला उभं कराल त्यांच्याकरिता धावायचं म्हटलं तर आम्हाला निदान वाईट तर वाटणार नाही. समग्र महिला आघाडीला शेतकरी संघटनेने, विनंती केली, की तुम्ही ग्रामीण भागातल्या तेहतीस जागा लढवता का पाहा? त्यांनी जर का हो म्हटलं तर, मी आजच तुमच्या सगळ्यांच्या वतीने समग्र महिला आघाडीला शब्द देतो, की त्यांनी जर असा निर्णय घेतला तर, शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता महिला आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याकरिता जिवाचे रान करेल!
 बस. अधिवेशनाचे हे निर्णय आहेत. ही लढाई आहे. या लढाईतली एक एक चाल तुम्हाला मी सांगितली. गावावर बिल्ला आणि जातीयवाद्याला दर ठेवणं आणि पाटी लावणं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पाडव्याला चालू करणं महत्त्वाची गोष्ट आहे. पुढाऱ्याला आणि जातीयवाद्याला चिमटा लावणारे हातभट्टी किंवा दारूचा गुत्ता आणि मटक्याचा अड्डा बंद करणे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३६