पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि कोणी त्याला भेटायला आलं तरी त्यानेच त्याची उठबस करायची. ही फार जुनी पद्धत आहे.
 जोतिबा फुल्यांनी याचं मोठं वर्णन केलं आहे. आता बळिराजा उठला आहे. हा भ्रष्टाचार आता संपणार आहे. फार जुन्या केसेस सोडून देऊ या; पण गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याला एखादं काम करून घेण्याकरिता लाच द्यायला लागली असेल, त्यांनी शेतकरी संघटनेच्या ऑफिसमध्ये यायचं, कार्यकर्त्याला सांगायचं, पाच रुपयाच्या स्टँप पेपरवर लिहून द्यायचं की, "अमक्या अमक्या अधिकाऱ्याने माझ्याकडून काम केलं वा केलं नाही, तरी माझ्याकडनं इतके पैसे घेतले." मात्र प्रामाणिकपणानं लिहून द्या आणि खोटे कागद करू नका, त्याच्यात धोका आहे. कुणावरती सूड उगवायचा म्हणून खोटा कागद कराल तर बळिराजाच्या गळ्याला फास बसेल! सर्व कार्य करायचं इमानानं आणि शेतकरी संघटेनच्या कार्यकर्त्याकडे जायचं. मग कार्यकर्ते काय करतात? त्या अधिकाऱ्याकडे जाऊन ऑफिसात भेटतात आणि त्याला म्हणतात, "हे बघ तू लाच घेतली हे आम्हाला माहीत आहे, तू काही 'नाही' म्हणायचा प्रयत्न करू नको. चुकी झाली, तुझं नाव बाहेर फोडणार नाही. तुझी नोकरी जावी अशी आमची इच्छा नाही. पण हे पैसे तुला परत द्यायला लागतील. पैसे परत दिले, सध्या भांडण मिटलं" आणि अशा पाच-दहा केसेस झाल्या की, मग एक मोठी शेतकऱ्यांची सभा बोलवायची आणि त्या शेतकऱ्यांना बोलवायचं आणि जाहीर करायचं, 'अमुक तमुक गावचे अमुक अमुक शेतकरी यांनी म.रा.वि. मंडळाच्या अधिकाऱ्याला (नाव नाही सांगायचं) अडीच हजार रुपय उसने दिले होते त्या त्या अधिकाऱ्यांनी परत केले. ते आम्ही परत करतोत.'
 भ्रष्टाचाराच्या विरुद्धचे आंदोलन म्हणजे राजीव गांधीच्या बोफोर्सविरुद्ध नाही. उलट राजीव गांधींनी साठ कोटी रुपये खाल्ले असं म्हटलं तर, शहरातील पुष्कळ माणसं काय म्हणतात माहिताय, "खायचाच की हो, अहो, सबइन्स्पेक्टर जर महिन्याला दोन लाख खातो, तर प्रायमिनिस्टरने साठ कोटी नको खायला?" उलट लोकांना त्याविषयी सहानुभूती वाटते. हे आपल्याला भ्रष्टाचाराचे भूत खालपासून गाडून टाकायचं आहे आणि यामुळे नोकरशाहीला धक्का लागणार आहे.
 तुम्ही समजून घ्या, जातीयवादाचं भूत पसरविणाऱ्या लोकांना भ्रष्टाचार निपटून काढाल तर जगता येणार नाही. जे राजकारणी आपल्यावर अत्याचार करतात, भ्रष्टाचार त्यांचं खाद्य आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये असं वातावरण तयार करून दाखवा की एकाही सरकारी नोकराला शेतकऱ्याकडनं लाच मागायची

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३३