पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही अशांच्या पोटाचा प्रश्न येणार. खरे तर आपण आमची संघटना आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा असा प्रश्नच उपस्थित होता कामा नये. शेवटी संघटना म्हणजे तरी काय? गावातला कणीही शेतकरी असो, शेतमजुरी करून पोट भरणारा शेतमजूर असो की अल्पभूधारक असो सर्वजण एकमेकांचे भाऊ आहेत. सबंध आंदोलनाच्या काळात कोणी उपाशी राहणार नाही अशी सर्व गावकऱ्यांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. शेजारच्या गावाकडेही लक्ष ठेवायला पाहिजे. गावात शिल्लक राहिलेली चतकोर भाकरीसुद्धा सर्वजण वाटून खाऊ अशी स्थिती असेल तरच संघटना झाली असे म्हणता येईल.
 एकदा गावामध्ये संघटनेचे सामर्थ्य निर्माण झाले म्हणजे कोणत्याही स्वरूपाची अडचण ही अनिवार्य राहणार नाही.
 आपल्या या आंदोलनाला पूरक म्हणून आणखीही काही कार्यक्रम आपल्याला हाती घ्यावे लागतील.
 १. पुढाऱ्यांना परवानगीशिवाय गावात प्रवेश करण्यास बंदी करा. शेतीमालाच्या भावाबद्दल नुसती वरवर, फसवी भाषणे करून चालणार नाहीत तर आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची तयारी असेल तरच तुम्हाला गावात प्रवेश मिळेल असे त्यांना ठणकावून सांगा.
 २. गावातील प्रत्येक भिंतीवर शेतकरी संघटनेच्या घोषणा रंगवून काढा. येत्या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी एकही भिंत मोकळी ठेवू नका.
 ३. टेरिलीन, टेरिकॉटसारखे कृत्रिम धाग्याचे कापड विकत घेण्याचे बंद करून फक्त सुती कापडच वापरायला सुरुवात करा.
 ४. आपल्याला जीवनावश्यक नाहीत अशा 'इंडियन' वस्तूंची खरेदी एक वर्षापुरती बंद ठेवा.
 आपण निर्धाराने आणि निष्ठेने एक वर्षभर हा कार्यक्रम अमलात आणला तर परभणी अधिवेशनाची घोषणा 'सौराज्य मिळवायचं औंदा' फलद्रूप होऊन भारताचा शतकानुशतकांचा वनवास संपेल इतकेच नव्हे तर जगामधल्या ज्या ज्या देशांमध्ये शेकऱ्यांची लूट करून औद्योगिकीकरणाची प्रक्रिया झाली आहे तिथे हा स्वातंत्र्याचा संदेश पोहोचणार आहे आणि त्या देशातील शेतकरी भावांचीही स्वातंत्र्यवर्षे प्रकाशमान होणार आहेत.

(१७-१९ फेब्रुवारी १९८४ शेतकरी संघटना दुसरे अधिवेशन, परभणी.)

(शेतकरी संघटक २० एप्रिल १९८४)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३०