पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि चमत्कार पाहा. 'भक्ती, युक्ती, शक्ती आणि तीन वर्षांत मुक्ती'.
 या लढाईच्या वेगवेगळ्या आघाड्या असतील.
 पहिली आघाडी आहे कायद्याच्या लढ्याची. ती कोर्टदरबारी लढायची आहे. त्याकरिता नाशिकमधील वकील मंडळींची एक समिती नेमण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या वतीने दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात आम्ही खटले लढवणार आहोत. या खटल्यात हिंदुस्थानातील चांगले चांगले नावाजलेले वकील शेतकऱ्यांची बाजू मांडतील अशी व्यवस्था आपण करणार आहोत - अगदी त्यांची फी देऊन.
 सगळे अधिकारी, मंत्री जरी 'इंडिया'चे असले तरी दिल्लीच्या न्यायालयाला 'भारता'विषयी काही भावना आहे असे वाटते. कोर्टदरबारात जाण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे.
 पहिला खटला आपण लावणार आहोत तो फ्री सेल साखरेसंबंधात. साडेचार लाख टन साखर 'फ्री सेल' मधून लेव्हीमध्ये जावी असा जो सरकारी आदेश देण्यात आलेला आहे तो आदेशच बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कांचा भंग करणारा आहे. तेव्हा तो रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येईल. त्याचबरोबर कांदा, कपाशी व इतर काही शेतीमाल यांच्या निर्यातीवरील बंधनेही बेकायदेशीर व शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कांचा भंग करणारी आहेत. ही बंधनेही रद्द करण्याची मागणी कोर्टापुढे करण्यात येईल.
 दुसरा खटला लावायचा आहे लेव्ही साखरेबद्दल. आपल्याकडून ६५% साखर लेव्ही म्हणून कमी दराने नेली जाते. ही पद्धतच बेकायदेशीर आहे. औषध मिळाले नाही म्हणून ज्या देशात लहानलहान पोरे पटापट मरतात त्या औषधांवर लेव्ही नाही, पण तो देश साखरेवर मात्र लेव्ही लावतो हे अन्यायकारक आहे. तेव्हा लेव्ही पद्धत बंद करावी यासाठीही खटला लावला जाणार आहे.
 गहू, कपाशी, साखर यांची परदेशातून आयात केली तीसुद्धा अन्यायकारक आहे. सरकारला देशातल्या शेतकऱ्याला गव्हाकरता १३० रुपयेच भाव द्यायचा असेल तर त्याला अमेरिकेतील शेतकऱ्याला १९४ रुपये देता यायचे नाहीत. देशातील उसाला टनाला ३०० रुपये भाव मिळत नसेल तर परदेशातील उसाला ३०० पेक्षा जास्त भाव देता येणार नाही. आमच्या कपाशीला ७०० रुपये देणार नसाल तर पाकिस्तानातल्या शेतकऱ्याला ९०० रुपये देण्याचा अधिकार सरकारला नाही. तेव्हा अशाप्रकारे केलेली आयात ही अन्यायकारक असून ती करण्यास सरकारला बंदी करावी अशी मागणी करणारा खटलाही लावण्यात येईल.
 आपण हे खटले देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ वकील नेमून लढवणार आहोत. तेव्हा लढाईची ही पहिली आघाडी ती वकील मंडळी सांभाळणार

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २१