पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि सरकारला अडचणीत आणू शकतात. हे मागल्या आंदोलनात त्यांनी अनुभवले. पुन्हा आंदोलन झाले तर ते दाबता यावे म्हणून सरकारने साखरेची आयात करून साखरेचा मोठा साठा जमा केला आहे.
 म्हणजे, सरकारने गेल्या वर्षीसारखे आंदोलन मोडून काढण्याची जय्यत तयारी केली आहे; पण यंदा आपल्या आंदोलनाचा मार्ग वेगळा राहणार आहे. या आंदोलनाच्या पायऱ्या मी आपल्याला समजावून देणार आहे.
 त्या आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. मागच्या वर्षी पिंपळगाव बसवंतला झालेल्या विजय मेळाव्यात माधव खंडेरावांनी सांगितले होते की, 'शेतकरी आंदोलनाचा विजय झाला आहे. शेतकरी आता निव्वळ लंगोट्या लावणारा किंवा धोतया राहिला नाही. याचा अर्थ, शेतकरी आता वरच्या पातळीवर गेला आहे. आता दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा मेळावा असेल तर तेथे जाताना विचारायचे - खुर्ची आहे का? मांडव घातलेला आहे का? तिथे काही चहापाण्याची व्यवस्था आहे का? शेतकरी संघटनेच्या मेळाव्याला मात्र आपल्या घरच्यासारखे येऊन मांडी घालून बसायचे.
 आता शेतकरी एका वेगळ्या इभ्रतीला आला आहे आणि या इभ्रतीला आल्यानंतर आता लाठ्या खाण्याची किंवा तुरुंगात जाण्याचीसुद्धा गरज नाही. काही न करता, केवळ डरकाळी फोडून आपण आपला भाग मिळवू शकतो. तुम्ही एक वर्षाचा अनुभव घेतला आणि शेतकरी संघटनेवर विश्वास व्यक्त केला. या विश्वासाच्या बळावर आम्ही आज इथे घोषणा करतो की शेतकरी संघटना तुम्हाला तीन वर्षांचा कार्यक्रम देत आहे. या तीन वर्षांत शेतकरी मुक्त झाल्याखेरीज राहणार नाही.
 महात्मा गांधींनी एक वर्षात स्वराज्याची हमी दिली होती. गेल्या आंदोलनात आणि वर्षानंतर आज तुम्ही जी ताकद दाखवली आहे ती लक्षात घेता तीन वर्षांत शेतकरी मुक्त झाल्याखेरीज राहत नाही. त्यासाठी अर्थात् तुमच्याकडून मला तीन गोष्टी पाहिजेत.
 पहिली गोष्ट म्हणजे तुमची शेतकरी संघटनेवर निष्ठा पाहिजे, शेतकरी संघटनेवर भक्ती पाहिजे. या तीन वर्षांपुरते तरी इतर ठिकाणच्या भक्तीभावना सोडून द्या. निवडणुका यायला अजून तीन वर्षे आहेत. त्या आल्यानंतर तुमच्यातुमच्या पुढाऱ्यांचे काय बघायचे असेल ते बघा; पण येत्या तीन वर्षांत त्यांच्याकडे काही बघू नका. शेतकरी संघटनेवरील इतकी भक्ती तुमच्याकडून हवी आहे. तुमची शेतकरी संघटनेवरील भक्ती, मी तुम्हाला सांगेन ती युक्ती आणि मागच्या आंदोलनात प्रत्ययाला आलेली शेतकऱ्यांची शक्ती यांचा समन्वय येत्या तीन वर्षांत होऊ द्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०