पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोण सांगेल की निर्यातीच्या मार्गात जर तुम्ही अडथळे आणलेत तर तुम्ही देशद्रोही आहात? मी कॉर्पोरेशन जर काढली तर ती कॉर्पोरेशन पी. व्ही. नरसिंहरावांना तुम्ही देशद्रोही आहात असं म्हणू शकणार नाही. ते काम शेतकरी संघटनेलाच करावं लागेल. शेतकऱ्यांनी जर काही प्रक्रिया करायच्या ठरवल्या आणि त्याच्यावर जर काही बंदी आली तर हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे हे म्हणायचं काम शेतकरी संघटनाच करू शकते.
 लक्ष्मीमुक्ती झाली पाहिजे, त्या लक्ष्मीमुक्तीबरोबर स्त्रियांनी आता त्यांच्या लहानशा दोनचारपाच गुंठ्यांत का होईना 'सीताशेती' करावी अशी कल्पना मी आळंदीला मांडली आणि त्याला जर सरकारने विरोध केला तर, वेळ पडली तर, सरकारला राजकीय विरोध करण्याचं काम शेतकरी संघटनेलाच करावं लागणार आहे.
 सर्व शेतकऱ्यांची बोली, सर्व शेतकऱ्यांची जीभ, सर्व शेतकऱ्यांची वाचा, सर्व शेतकऱ्यांची शक्ती शेतकरी संघटनाच राहणार आहे; पण शेतकरी संघटनेच्या बरोबरीने, बाजूने काही कामं करण्याची आवश्यकता आहे, जी कामं शेतकरी संघटना करू शकत नाही. जसं, परभणीला आपण शेतकरी संघटनेच्या बरोबरीने कृषि योगक्षेम संशोधन न्यास या वेगळ्या न्यासाकडे जबाबदारी सोपविली. कशाकरिता? की शेतकरी संघटना रजिस्टर्ड नाही. मग निधी कुणाच्या नावाने गोळा करायचा, एक लहानशी संस्था तयार केली. तसं, शेतकऱ्यांच्या घरोघर कपाशीचे रेचे चालावेत, फलोद्योग शेतकऱ्यांच्या घरी फळप्रक्रियेचे कारखाने तयार व्हावेत, दूध शेतकऱ्यांनीसुद्धा दूध विकायला नेऊ नये, त्याच्या वस्तू तयार करूनच न्याव्यात, या सगळ्याकरिता एक मोठी बांधणी, एक यंत्रणा तयार करणं आवश्यक आहे.
 नव्या रणनीतीची चाचणी
 मी माझं भाषण इथं संपवणार आहे. पण संपवताना आणखी एक गोष्ट सांगून संपवणार आहे. ती ही की आळंदीची बैठक झाल्यानंतर मी धावत धावत वाला आलो ते काही उगाच नाही. आपण ज्या रस्त्याने आता शेतकरी आंदोलन, शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव मिळावा याकरिता जी काही कारस्थानं होतात ती हाणून पाडण्याचं आंदोलन, ज्या नव्या रणनीतीनं चालवणार आहोत, त्या रणनीतीमध्ये वर्धा जिल्ह्याने एक महत्त्वाचं काम करावं अशी माझी इच्छा आहे. मी तुमच्यावर ही जबाबदारी का टाकू इच्छितो? पहिली गोष्ट म्हणजे या इथे हा कार्यकर्त्यांचा संच आहे. मधमाशांचं मोहोळ आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये एखादी योजना लागू करण्याच्या आधी कुठं तरी एका प्रयोगशाळेमध्ये त्याचा प्रयोग होण्याची आवश्यकता आहे. वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून. स्वावलंबी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६१