पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बनवण्याच्या वल्गना आजपर्यंत अनेक वेळा झाल्या; पण मला असं वाटतं, की हा आपला आंदोलनाचा कार्यक्रम, मी काही गांधीवादी नाही, तरीसुद्धा असं म्हणतो की गांधीविचाराच्या खऱ्या प्रेरणेला ज्यामुळे आनंद वाटेल अशा तहेचा हा कार्यक्रम; वर्धा जिल्ह्यामध्ये आपण त्याचा प्रथम प्रयोग करून पाहावा. इथं आपण काही शिकावं आणि जर त्यामध्ये काही चूका दिसल्या तर त्या दुरुस्त कराव्या आणि मग त्या इतर महाराष्ट्रामध्ये किंवा देशाच्या इतर भागांमध्येसुद्धा राबवाव्या अशी माझी इच्छा आहे. गुजरातची मंडळी मी इथं बोलावून घेतली. एका अर्थाने, या मागेसुद्धा योजना आहे. शेतकऱ्यांच्या संघटना पुष्कळ राज्यांत आहेत. चौदा-पंधरा राज्यांत आहेत म्हणतात; पण जर का हा कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर आपल्याला गुजरातमधील शेतकऱ्यांकडून पुष्कळ शिकायचं आहे. त्यांनी शेती आणि व्यापार हा एकत्र केला आहे, व्यापारी आर्थिक संस्था यांचा अनुभव गुजरातमधल्या शेतकऱ्यांचा जास्त आहे. ही बांधणी करायची झाली तर महाराष्ट्रातल्या, गुजरातमधल्या आणि काही प्रमाणामध्ये पंजाबमधल्या या तीनच राज्यातल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा यावं एवढं पुष्कळ झालं. जर का ही बांधणी यशस्वी झाली तर आपण मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन शेतीमालाला भाव मिळविण्याच्या लढ्याचा खऱ्या अर्थाने यशस्वी शेवट करू शकू असा मला विश्वास वाटतो.
 आपण पुष्कळ वेळा डोळ्यातून पाणी काढलं. ३१ ऑक्टोबर १९८४ ला टेहऱ्याला मंचाकडे जाता जाता इंदिरा गांधींच्या मृत्यूची बातमी आली आणि आपले सगळे आडाखे कोसळले याचं आपल्याला दुःख झालं.९१ मध्ये पंचायतीच्या दिवशी चंद्रशेखर सरकार कोसळलं. शेतकरी खरंच दुर्दैवी आहे की काय असं मला काही काही वेळा वाटायाला लागतं आणि नंतर माझ्या असं लक्षात येतं की ज्या बाजूने सूर्योदय होतो आहे असं वाटून आपण तिकडे पाहत बसलो होतो. तिथं सूर्य दिसला नाही, तिथं ढग आले; पण प्रत्यक्षात सूर्य दुसरीकडे थोडासा बाजूला उगवू लागला आहे. त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं नव्हतं एवढंच. सरकार हे निर्बल झालं आहे, शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची आर्थिक ताकद त्याच्यामध्ये राहिलेली नाही. ही केवढी मोठी संधी आपल्यापुढे वाढून आली आहे. १९८० मध्ये ज्या तऱ्हेच्या शेतकरी आंदोलनाचे आपण नियोजन केलं ते आंदोलन प्रत्यक्षात उभं करण्याची संधी आपल्यापुढे आलेली आहे.
 मग आता या सगळ्या गोष्टी तुम्ही हो म्हटलं तर पुढे मांडणार आहे. १९८० सालच्या आंदोलनात मी काय म्हणत असे? मी आंदोलनामध्ये काही निर्णय घेतले, मला निर्णय घेणं भाग आहे. तुम्हाला ते निर्णय पटले नाहीत तर तुम्ही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६२