पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तितकी किंमत आम्हाला द्या. आम्ही खुश राहू असं आजपर्यंत आम्ही म्हणत होतो. आता परिस्थिती वेगळी आहे. सरकार दिवाळखोर झाले आहे. त्याने किंमत द्यायचे ठरवले तरी त्याची अंमलबजावणी होण्यासारखी नाही. आता भाव आपला आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. या सरकारची काही गरज नाही. शेतीमालाचा खर्च कमी करण्याकरिता आणि देशाचं परकीय चलन वाचविण्याकरिता शेती करण्याच्या काही नवीन पद्धती काढायला लागतील.
 त्याच्यातला पहिला भाग, हा परकीय चलन कमी खर्च करण्याकरिता की आपल्या शेतीमध्ये वरखतं आणि विशेषतः परदेशातून आयात होणारी औषधं यांचा कमीत कमी वापर झाला पाहिजे. त्यांच्यामुळे देशातलं उत्पादन कमी झालं आणि परभणीचा कार्यक्रम अप्रत्यक्षपणे राबवला गेला तरी त्याला इलाज नाही. पण आम्ही परकीय चलनामध्ये खर्च करून शेती चालविणार नाही. स्वतःच्या पायावर उभं राहणार, दोन तीन वर्षे त्रास झाला तरी चालेल. उत्पादन कमी झालं तरी चालेल. पण आम्ही (या मार्गाने) पुढे जाणार आहोत.
 प्रक्रिया उद्योग
 दुसरा मुद्दा महत्त्वाचा. औद्योगिक धोरणामध्ये कारखानदारांना सरकारने आता खुले आम परवानगी दिली. तुम्ही कोणताही कारखाना काढा, कोणत्याही लायसेन्सची गरज नाही, कोणत्याही परवान्याची गरज नाही. फक्त शेतकऱ्याला मात्र हा नियम लागू नाही. कापूस शेतकऱ्यांनी कापूसच पिकवला पाहिजे. त्याची रूईसुद्धा करायची म्हटलं तर परवानगी नाही. परवा आम्ही मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली. त्यांना म्हटलं, आम्ही कपाशीच का विकायची, कापसाची रूई आम्ही घरातल्या घरात बसून करू शकतो. साठसत्तर रुपये काय देता रूई बनविण्याकरिता ते आम्हाला द्या. आम्हाला मिळतील, घरामध्ये. ते म्हणाले, नाही, कायदा असा आहे की शेतकऱ्याला रूई करता येत नाही. म्हटलं, हा कायदा केला कुणी? तुम्हीच केला ना? ६० कोटी किंवा १०० कोटी रुपयांचा कारखाना काढायचा झाला तर दिल्ली सरकार म्हणतं कुणाच्याही परवान्याची गरज नाही आणि पाच हॉर्सपॉवरचं एक इंजिन घेऊन त्याच्यावर एक रेचा बसवायचा झाला आणि रूई काढायची झाली तर तुम्ही नाही म्हणता? तुम्ही जर का शेतकऱ्याच्या उद्योगधंद्यांवर अशी बंदी घातली, कारखानदारांवर जी बंदी नाही ती तुम्ही शेतकऱ्यांवर घातली तर आम्ही पुन्हा तुमच्याविरुद्ध आंदोलनाला उभं राहू. का? शेतकऱ्यांच्या स्वार्थाकरिता नव्हे तर शेतकरी देश वाचवायला निघाला आहे आणि तुम्ही कर्मदरिद्री - देश बुडवायला निघाला आहात. म्हणून आम्ही आंदोलनाकरता तयार आहोत.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ५९