पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कपाशीचं काय होणार? ज्वारीचं काय होणार आहे? सोयाबीनचं काय झालं? सूर्यफुलाचं काय होत आहे? आज तरी चित्र काही स्पष्ट नाही. सगळीकडेच थोडा अंधार आहे. आपल्या डोळ्यासमोर असलेल्या अशा या तातडीच्या गोष्टी. त्याच्या पलीकडे, अख्ख्या महाराष्ट्रात काय घडत आहे, दिल्लीला काय घडत आहे, कसलं सरकार आलं आहे, त्याची नीती काय असणार आहे, हे अंदाजपत्रक काय झालं आहे, औद्योगिक धोरण काय झाले, काय चाललं आहे काय? सध्याची वर्तमानपत्रातली सगळी भाषाच मुळी गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या भाषेपेक्षा अगदी वेगळी आहे. परिस्थिती काय आहे हे समजल्याखेरीज पुढचं पाऊलसुद्धा टाकणं मोठं कठीण झालं आहे. चांगल्या म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासुद्धा मनामध्ये काही शंका निर्माण व्हाव्या अशी परिस्थिती आहे. जनता दलाचा एक कार्यक्रम ठरलेला आहे की, २७ सप्टेंबरला ते दिल्लीच्या बोटक्लबवर शेतकऱ्यांचा एक मोठा मेळावा भरवणार आहेत आणि त्या मेळाव्यामध्ये खतांच्या वाढलेल्या किमतींचा निषेध करून त्याबद्दल काही आंदोलनाचा कार्यक्रम कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली जी भारतीय किसान युनियन तयार झाली आहे तिची बैठक १५ सप्टेंबर रोजी दिल्लीला झाली. कर्नाटकाचे नेते नंजुंडस्वामी यांच्या प्रस्तावाप्रमाणे असं ठरलं की भारतात शेतकरी संघटना कोणती असेल ती ती एकच आणि ती म्हणजे भारतीय किसान युनियन; त्यांचा झेंडा एकच, तो म्हणजे भाकियूचा आहे तो आणि सगळ्या शेतकऱ्यांचा नेता कुणी असेल तर ते महेंद्रसिंह टिकैत. भाकियूचा पहिला कार्यक्रम आहे २ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या बोटक्लबवर पुन्हा एकदा मेळावा भरविणे आणि पुन्हा एकदा वरखताच्या वाढलेल्या किमतींच्याविरुद्ध आंदोलन चालू करणे. म्हणजे ज्या प्रकारची आंदोलनं आपण गेले दशकभर केली त्याचप्रकारची आंदोलनं ही आता कोण करत आहे? इतके दिवस या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये ज्यांनी कधी उत्साहाने भाग घेतला नाही, किंबहुना दृष्ट लागावी इतका सुंदर आणि भव्य किसान मेळावा दिल्लीला भरत असताना त्याला नतद्रष्टपणे अपशकून करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना आता बोटक्लबवर पुन्हा मेळावा भरवावेसे वाटू लागले आहे.
 काय करायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे? मला असं वाटतं की, काहीतरी आंदोलन केलं पाहिजे अशी मनाला आणि शरीराला सवय लागली म्हणून किंवा दुसरे काही सुचत नाही म्हणून तेच तेच करत उगाचच पुढे जायचं असं केल्यानं काही साध्य होत नाही. आपण महाराष्ट्रातले आहोत. आपली प्रसिद्धी गनीमी काव्याकरिता आहे. रणझुंझार योद्धे राजपूत यांना जे जमलं नाही ते महाराष्ट्रातल्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ४६