पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आता हवी नवी हत्यारे आणि नवी व्यूहरचन


 शेतकरी संघटनेच्या दशकाहून अधिक कालावधीच्या वाटचालीनंतर आता, देशात घडून आलेले परिस्थितीतील बदल लक्षात घेता संघटनेच्या पुढील कार्यक्रमांची आखणी करण्याच्या व आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या या घटकेला उच्चाधिकार समितीने श्री. किशोर माथनकर यांची शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तर सौ.सुमनताई अग्रवाल यांची शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि आळंदी येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते त्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले. बदललेल्या परिस्थितीत या दोन्ही अध्यक्षांवर काय जबाबदाऱ्या आहेत?
 पहिली गोष्ट म्हणजे यापुढे शेतकरी संघटनेचा अध्यक्ष मी किंवा उच्चाधिकार समिती ठरविणार नाही. किशोर हा उच्चाधिकार समितीने नियुक्त केलेला आणि नंतर सर्वानुमते मान्य झालेला असा शेवटचा अध्यक्ष हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी निवडून दिलेला असावा. त्या निवडणुका कशा व्हाव्यात, गावपातळीवर त्यांची पद्धती काय असावी, तालुका पातळीवर याकरिता काहीएक योजना ठरवायची आहे, गावोगाव संघटना तयार करायची आहे, या निवडणुका घडवून आणायच्या आहेत आणि अशा तऱ्हेने निवडून आलेला अध्यक्ष अध्यक्षपदी बसल्यानंतरच किशोरची या कामातून सुटका होणार आहे. एवढी बांधणी करणे हे किशोर आणि सुमनताईंचे किमान काम आहे.
 शेतकरी आंदोलनापुढील आव्हाने यापलीकडे काय परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहणार आहे? सांगणं कठीण आहे. तीन महिन्यांपूर्वी विदर्भामध्ये जागोजाग असे महापूर येऊन गेले की एकेका गावातली किती माणसं वाहून गेली त्याचा हिशोब अजून लागलेला नाही आणि त्या महापुराच्या चिखलाचा वास अजून नाकात आहे. तेवढ्यातच दुष्काळाची सावली या विदर्भावर पुन्हा पडायला लागली आहे. नेमकं काय होणार आहे?

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ४५