पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डोंगरखोऱ्यातल्या मावळ्यांनी करून दाखवलं हा प्रत्यक्ष इतिहास आहे. कारण त्यांनी लढाईमध्ये नुसती तलवार वापरली नाही, तर तलवारीबरोबर आपली बुद्धी वापरली. आपण काय करायला निघालो होतो, कुठे आलो आहोत आणि यापुढे कोणत्या दिशेने जायचं आहे याचा थोडा स्पष्ट विचार करणं आवश्यक आहे आणि याकरिता मी दोन बैठकी बोलावल्या. एक १४/१५ ऑगस्ट १९९१ रोजी आंबेठाणला बोलावली. ती बैठक बोलावताना मी मुद्दाम म्हटलं, काही विषयपत्रिका नाही; ही कार्यकारिणीची बैठकच नाही, तुम्ही नुसतं गप्पा मारायला या. कशाकरिता? नवीन विचार करताना मनावर कोणतीच चौकट नको. स्पष्टपणे, मोकळेपणे सगळ्यांना बोलता यावं म्हणून गप्पांची बैठक घेतली. त्याच्यानंतर, आळंदीला एक बैठक झाली आणि आजही काही चित्र फार स्पष्ट दिसत आहे असं नाही; पण जे काही थोडं दिसतं ते तुमच्यापुढे मांडणार आहे. एवढ्याकरिता की आजपर्यंतचा माझा अनुभव असा की जेव्हा जेव्हा शंका वाटली, जेव्हा जेव्हा अंधार दिसला, पुढे कसं जावं हे कळेनासं वाटलं त्या त्या वेळी शेतकरी आणि शेतकरी कार्यकर्ते यांच्यासमोर मी आलो आणि मला त्या प्रश्नांची उत्तरं आंबेठाणला खोलीत बसून किंवा पुस्तकात किंवा वर्तमानपत्रात मिळाली नाहीत, ती तुमच्या चेहऱ्यांवर आजपर्यंत प्रत्येकवेळी दिसली. तसंच उत्तर तुमच्या चेहऱ्यावर शोधण्यासाठी मी पुन्हा एकदा आलो आहे.
 आळंदीला मी एक कार्यक्रम मांडला आणि तो कार्यक्रम मांडल्यानंतर सगळ्याच, माझ्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांच्या चेहेऱ्यावरसुद्धा गोंधळ दिसला. त्यांच्या चेहऱ्यावर मला असं काही दिसलं की शरद जोशी पूर्वी काहीतरी वेगळं सांगत होते आणि आता काहीतरी वेगळं सांगायला लागलेले आहेत आणि मी जितका कसोशीने प्रयत्न केला होता तो पाहता, मला तर असं वाटत होतं, की गेल्या दहा वर्षांमध्ये मी एक कोणती फार मोठी चूक केली असेल तर ती ही की दहा वर्षांमध्ये एका शब्दानेही तर्कशास्त्र न सोडता, सुसंगतपणे मी कार्यक्रम मांडत आलो. हीच कदाचित चूक केली. या सगळ्या सार्वजनिक आयुष्यामध्ये इतकी सुसंगती ही समजायला कठीण जाते. राजीव गांधींनी एक दिवस म्हटलं की मला राजकारणात काहीही स्वारस्य नाही आणि त्याच्यानंतर दोन महिन्यांत ते राजकारणात आले, चार महिन्यांत पंतप्रधान झाले; कुणाला काही त्याच्यामध्ये काही चूक झाली असं वाटलं नाही. शरद पवारांनी मी कधी काँग्रेसमध्ये गेलो तर... काय वाटेल ते म्हटलं आणि एक दिवस ते काँग्रेसमध्ये गेले, फार काही बिघडलं, चुकलं असं काही कुणाला वाटलं नाही. उघड उघड शब्दांचा खेळ करून उलट वागणारी, स्वार्थाचंच तर्कशास्त्र करणारी मंडळी चालून गेली. त्याच्याबद्दल कुणी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ४७