पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मी या बैठकीला येताना आपल्या आंदोलनाच्या इतिहासाचा विचार करीत होतो. ज्यांच्या आधाराने सुरुवातीची आंदोलने उभी राहिली ती मंडळी इतक्या अल्पबुद्धीची आणि हस्वदृष्टीची ठरली की ज्यांची बुद्धी त्यांच्या त्यांच्या गावातालुक्याच्या पलीकडे जात नाही, ज्यांची बुद्धी स्थानिक साखर कारखान्याच्या किंवा सहकारी संस्थेच्या राजकारणाच्या पलीकडे जात नाही. आपला स्वार्थ जरा कोठे साधला जातो आहे असे म्हटल्यानंतर शेतकरी संघटनेला सोडून ते त्या स्वार्थाच्या मागे धावले. अगदी माधवराव खंडेराव मोरेंच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'मांजरासमोर तुम्ही किती मिठाई ठेवली तरी ती खात असताना उंदीर दिसला तर मांजर उंदराच्या मागे पळत सुटते' हा अनुभव मी जसा सुरुवातीला घेतला तसा तो पुढेही येत राहिला. ज्यांना मी अत्यंत प्रेमाने मुलासारखे वागवले, वाढवले; माझ्या हाती जी काही देण्यासारखी साधने होती ती त्यांच्या हाती दिली अशी मंडळीही शेतकरी संघटनेपासून दूर गेली एवढेच नव्हे तर शेतकरी संघटनेपासून दूर गेल्यानंतर 'शेतकरी संघटना आणि प्रामुख्याने शरद जोशी यांना शिव्या देणे' हाच एक कलमी कार्यक्रम त्यांनी राबवला. आता तर आमचीच संघटना खरी म्हणून काही मंडळींनी वेगळी चूल मांडली आहे आणि ते शेतकरी संघटनेचीच भाषा बोलत असल्याने काही भोळेभाबडे पाईक संभ्रमाने त्यांच्यासमोर जाऊन बसतात.
 महिनाभरापूर्वी अंबाजोगाईला श्रीरंगराव मोरे यांचा अमृतमहोत्सव सत्कार समारंभ झाला. मी निवडणुकांच्या तोंडावर शेतकरी संघटकच्या २१ जानेवारी २००९ च्या अंकातील 'आता देश वाचविणे फक्त मतदारांच्या हाती' या लेखातून जो विचार मांडला आहे, तो प्रथम त्यावेळी मांडला. त्यालाही एक औचित्य होते. कारण श्रीरंगनानांच्या याच अंबाजोगाईत त्यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात मी जी काही शेतकरी संघटनेच्या अर्थशास्त्राची मांडणी केली त्यावरूनच शेतकरी संघटनेचे बायबल म्हटल्या गेलेल्या 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' या पुस्तकाची निर्मिती झाली. त्यावेळी, म्हणजे १९८० साली शेतीक्षेत्राची आणि शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी होती, आज वेगळी आहे. वेगळी आहे म्हणजे त्या वेळचे प्रश्न सुटले आहेत असे नाही. आजही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू नये हे सरकारचे धोरण चालूच आहे. 'शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती' या पुस्तकात, भाव पाडण्याची एक कारवाई म्हणून मी डाळीच्या आयातीचे उदाहरण दिले आहे. आजही सरकारने दहा हजार टन डाळींची आयात करण्याचा निर्णय घेऊन डाळीचे भाव पाडण्याचे कारस्थान सरकारने आखले आहे. डाळीचे भाव पडले तर शहरातील लोकांवर काही आकाश

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१२