पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोसळणार नाही; अजूनही ते, महागाई वाढली असली तरी, सोन्याचांदीच्या दुकानांत गर्दी करून सोन्याचांदीची खरेदी करतात. या लोकांना डाळी थोड्या महाग किमतीने घ्यायला लागून शेतकऱ्यांना जर दोन पैसे जास्त मिळाले तर सरकारला त्यात दुःख व्हायचे काय कारण आहे? डाळींची आयात, खाद्यतेलाच्या आयातीला मुक्तदार, मक्याच्या, तांदळाच्या निर्यातीवर बंदी, दूध पावडरच्या निर्यातीवर बंदी, शेतीमालाच्या वायदेबाजारावर बंदी अशी शेतीमालाचे भाव पाडणारी सगळीच धोरणे सुरूच आहेत.
 त्याशिवाय, एकेका शेतीमालाचा भाव मागत राहण्याऐवजी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा जो कार्यक्रम शेतकरी संघटनेने ठरवला त्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना फसवून बाजूला काढण्याकरिता हजारो कोटी रुपयांची कर्जमाफीची योजना सरकारने जाहीर केली. कर्जमुक्तीच्या मागणीपासून ढळलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात फायदा काहीच झाला नाही. फायदा झाला तो, शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे ज्या सहकारी बँका बुडायला आल्या होत्या त्यांचा झाला. कर्जबाजारी झाले म्हणून शेतकरी कर्ज घ्यायला येत नाहीत, त्यामुळे या सहकारी बँकांची कर्जाची दुकानदारी सुरू राहावी म्हणून केवळ सरकारने शेतकऱ्यांच्या नावाने ही कर्जमाफी जाहीर केली.
 १९८० पेक्षा आजची परिस्थिती वेगळी असली तरी जुने प्रश्न सुटलेले नाही. पण त्यांच्याबरोबर, औरंगाबाद अधिवेशनात ज्यांच्यावर चर्चा झाली असे, नवीन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. हवामान बदलते आहे, उष्णतामान वाढत आहे, थंडी वाढणार आहे, पावसाळा चार महिन्यांचा एकाच महिन्यात कोसळणार आहे, वगैरे वगैरे. या परिस्थितीत आजपर्यंत आपल्या सवयीची झालेली आकाशाखालील शेती, म्हणजे सूर्याला जी दिसते ती शेती यापुढे अशक्य होणार आहे. आता नवीन प्रकारची शेती करण्याची आवश्यकता आहे, ज्यावर चर्चा करण्याकरिताच शेतकरी संघटनेचे औरंगाबाद येथील अधिवेशन भरवले होते. शेतकऱ्यांना अत्यंत कठीण दिवस येत आहेत.
 नानांच्या त्या सत्कारसमारंभात ही मांडणी करीत असताना तेथे, सुदैवाने, आपल्यातून फुटून गेलेले काही मित्रही होते. मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हटले की तुमच्यापैकी काही जणांना जर असे वाटले असेल की आपल्याला लाडक्या पोराची वागणूक मिळाली नाही, सावत्रपणे वागवले गेले; आपल्याला संघटनेत फारसे महत्त्व मिळाले नाही असे ज्यांना वाटत असेल तर ते माझ्या चुकीमुळे असेल, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो; पण शेतकऱ्यावर इतका कठीण प्रसंग आला असताना शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या राहुट्या टाकू नका; सगळ्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१३