पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१८०० रुपये क्विटलने गहू आयात करण्याचे धोरण राबवले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणाऱ्या वायदेबाजारावर निर्बंध लादले. पंडित नेहरूंच्या काळापासून सुरू झालेला, शेतीमालाचे भाव पाडण्याचा धंदाच शरद पवारांनी पुन्हा एकदा चालू केला. खाद्यतेलाच्या आयातीवरील कर माफ केला. तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. मक्याच्या निर्यातीला बंदी केली, दुधाच्या भुकटीच्या निर्यातीला बंदी केली. वायदेबाजारामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला २७००२८०० प्रति क्विटल भाव मिळायला लागला होता त्या वायदेबाजारावर बंदी घालून सोयाबीनचे भाव २००० रुपयांच्याही खाली पाडले आणि 'शेतकऱ्याचं मरण, हेच सरकारचं धोरण' हे कृषिमंत्र्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.
 अनैतिक आणि बेकायदेशीर कर्जामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणे, शेतीमालाचे भाव पाडण्याची सरकारी धोरणे, शेतीमालाच्या वायदेबाजारावर बंदी ही शेतकऱ्यांसमोर उभी ठाकलेली 'सुलतानी' संकटे आहेत.
 आता शेतकऱ्यांचे दुर्दैव असे की आता 'आसमानी' संकटांचेही ढग आकाशात जमू लागले आहेत. जागतिक हवामानामध्ये बदल घडू लागला आहे. हिंदुस्थानामध्येसुद्धा तापमान ४८ अंशांपर्यंत जाईल की काय आणि थंड झाले तर ते २-३ अंशांपर्यंत उतरेल की काय अशी भीती वाटू लागली आहे. अशी स्थिती झाली तर शेती करायची कशी, या स्थितीत बियाणे कोणती चालतील, कोणती तग धरतील असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यापलीकडे शेतीमध्ये घालायला पाणी नाही, पाणी असेल तर ते उचलून शेतात टाकायला वीज नाही, वीज नाही तर डिझेल इंजिन वापरावे तर डिझेलचा तुटवडा अशा कचाट्यात शेतकरी सापडला आहे.
 या काळात सर्वदूर आणखी एक मोठा बदल घडून आला आहे. ३२ वर्षांपूर्वी मी जेव्हा शेतकरी झालो तेव्हा ज्या जमिनीची किंमत २ ते ५ हजार रुपये होती त्या जमिनीच्या किमती आता ३० लाख, ४० लाख रुपयांपर्यंत वाढल्या आहेत आणि सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मनातसुद्धा, केवळ थकल्यामुळे असा विचार येऊ लागला की, आजवर आम्ही पुष्कळ सोसले, बापाचे नाव चालवावे म्हणून आम्ही शेती केली, 'सौ के साठ करना, और बाप का नाम चलाना' असे दिसत असले तरी शेती केली; पण, स्वतः जीव द्यावा अशी आता वेळ आली असेल तर आमच्याच्याने शेती निभणार नाही. आईबापांची क्षमा मागून, आजोबापणजोबांची क्षमा मागून की त्यांच्या खानदानाची जमीन आम्हाला चालवता आली नाही, आत्महत्या करून आमच्या परिवाराला अनाथ करण्यापेक्षा ही जमीन विकून बरे पैसे येण्याची ही संधी साधून आयुष्याचे शेवटचे दिवस परिवारासह सुखाने

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३०१