पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घालवू या.
 या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाची घोषणा केली आणि तुम्हा सर्व शेतकऱ्यांना निमंत्रण दिले.
 अधिवेशनाचे विषयसूत्र
  आणि या अधिवेशनाचे घोषवाक्य ठरले, 'पुन्हा एकदा उत्तम शेती'
 शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका. आपल्या कुटुंबाला अनाथ करू नका? अशा तहेची नकारात्मक भाषा मी वापरली नाही. शेतकऱ्यांच्या मनामध्ये उत्साह तयार करणारे हे घोषवाक्य आहे - 'पुन्हा एकदा उत्तम शेती'
 स्वातंत्र्यानंतरच्या काळातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा इतिहास थोडक्यात असा सांगता येईल. स्वातंत्र्याच्या आधी हिंदी असो, पंजाबी असो, मराठी असो - हिंदुस्थानातल्या सगळ्या भाषांमध्ये, बोलींमध्ये एक म्हण होती – 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी'. नोकरी करणाऱ्या माणसाला एकेकाळी लग्नासाठी मुलगी मिळणे अवघड होते. स्वातंत्र्य मिळाले, पंडित नेहरूंचे राज्य आले आणि परिस्थिती बदलत बदलत अशी झाली की आता चांगले चांगले शेतकरी, त्यांना जर जगायचे असेल तर शेतीवर जगता येत नाही याचा कटू अनुभव घेतल्यामुळे आपला मुलगा चपराशी व्हावा याकरिता एकदोन एकर जमीन विकून साहेबाला मलिदा चारतात. पंडित नेहरूंच्याबद्दल आता कितीही गोडवे गाईले जावोत पण इतिहासात त्यांची नोंद करायची झाली तर ती 'ज्या एका पंतप्रधानाने उत्तम शेतीला कनिष्ठ केली आणि जी नोकरी कनिष्ठ होती तिला उत्तम स्थानी आणली अशी व्यक्ती' अशीच करावी लागेल.
 आपण या अधिवेशनात शेतकऱ्यांना बोलवले ते 'आत्महत्या करू नका, आज नाही उद्या कर्जफेड होईल' असा धीर देण्यासाठी नाही तर शेती ही इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा श्रेष्ठ आहे हे आपल्याला पुन्हा एकदा दाखवून द्यायचे आहे' असे आवाहन करून बोलावले. शेतीला सर्वश्रेष्ठ कसे बनवायचे याबद्दल गेल्या तीन दिवसांत तब्बल २७ तास चर्चा झाली. त्यासंबंधी ठराव झाले त्यांना तुम्ही सर्वांना घोषणांच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात मान्यताही दिली.
 ठरावांचे महत्त्व
 सगळ्या ठरावांचे सार एका वाक्यात सांगता येईल, 'शेतकऱ्यांनो, जगायचे असेल तर एकच मंत्र जपा - एटी, ईटी, बीटी, आयटी.
 एटी म्हणजे एरोपोनिक्स् तंत्रज्ञान अर्थात 'विना माती शेती'
 ईटी म्हणजे इथेनॉल तंत्रज्ञान अर्थात 'शेततेल उत्पादन'
 बीटी म्हणजे जैविक तंत्रज्ञान आणि

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३०२