पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मौल्यवान आहे.
 ब्राझिलसारख्या देशामध्ये मोटारगाडीसाठी वापरायच्या पेट्रोलमध्ये ४०% इथेनॉल वापरले जाते. ते आणखी वाढण्यावर बंधन नाही. आपल्या देशामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने फक्त ५% इथेनॉल मिसळण्याची परवानगी दिली होती. पेट्रोलचे भाव वाढले तेव्हा मनमोहन सिंगांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले तेव्हा, खरे तर, सांगायला पाहिजे होते की यापुढे पेट्रोलमध्ये इथेनॉल किती मिसळावे यावर काहीही बंधन असणार नाही. प्रत्येक गाडीचालकाने किंवा मालकाने आपल्या गाडीसाठी मिश्रणाचे प्रमाण ठरवावे. आपल्या देशातील ९०% मोटारसायकली केवळ रॉकेलवर चालतात, तिथे मिश्रणाचे प्रमाण सरकारने ठरवण्यात काय प्रयोजन आहे?
 इथेनॉलला किंमत काय द्यायची? पेट्रोलची किंमत आज प्रति लिटर ५५ रुपये आहे आणि शेतकऱ्याच्या 'शेतीतेला'ला म्हणजे इथेनॉलला सरकारने बांधून दिलेली प्रति लीटर जास्तीत जास्त किंमत आहे फक्त २१ रुपये ५० पैसे. म्हणजे त्या दाढीवाल्या शेखांकडून इंधन आले म्हणजे त्याला ५५ रुपये आणि शेतकऱ्याच्या शेतातून आले म्हणजे फक्त २१ रुपये ५० पैसे. हे काय गौडबंगाल आहे? आमची मागणी अशी आहे की इथेनॉल तयार करणाऱ्या कोणत्याही कारखान्याने पेट्रोल कंपन्यांकडून टेंडरे मागवून ३० रुपयांच्या वर भाव देणारी टेंडरेच विचारात घेऊन इथेनॉलची विक्री करावी.
 हे झाले तर पाच वर्षाच्या आत शेतकऱ्याची परिस्थिती बदलणार आहे; कर्जमुक्तीचे आंदोलन करण्याचीही गरज उरणार नाही.
 ऊसदर आणि इथेनॉल
 साखर कारखान्यांनी इथेनॉल तयार करायला सुरुवात केली तर किती फरक पडतो पाहू या.
 उसाला भाव काय द्यावा? ६५० का ६८०? जास्तीत जास्त मागण्या करणाऱ्यांची झेप अकराशे, साडेअकराशे, बाराशेपर्यंत जाते. आम्ही हिशेब तपासून पाहिले. ऊस-इथेनॉल लढ्याचे सेनापती श्री. शामराव देसाई यांनी त्यावर मोठा अभ्यास केला आहे. कारखान्यांना इथेनॉल करण्याची परवानगी मिळाली आणि त्या इथेनॉलला फक्त २१ रुपये ५० पैसे भाव मिळाला तरीसुद्धा उसाला टनामागे १९०० रुपये भाव मिळू शकतो. तेव्हा आता ७००-८०० करताचे भांडण सोडून द्या, वैधानिक किमान किमतीचा वाद सोडून द्या. हे वाद आता कालबाह्य झाले आहेत. शेतकऱ्यांना आता नवीन युगामध्ये घेऊन जायचे असेल तर त्याकरिता वेगळ्या तऱ्हेची आंदोलने, वेगळ्या तऱ्हेची रणनीती वापरून वेगळ्या तऱ्हेच्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८२