पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे? सर्व ऊसउत्पादकांना माहीत आहे की उसापासून अल्कोहोल तयार होते आणि अल्कोहोलचा उपयोग फक्त 'पिण्या'करताच करायचा असतो असे नाही. साखर कारखानदारांनी जर 'सहकारी' कारखानदारी केली नसती तर जी काही अनेक मौल्यवान रसायने तयार झाली असती त्यापैकी 'शेतीतेल' हा एक पदार्थ आहे. अल्कोहोलमध्ये थोड्या प्रमाणात पाण्याचा अंश असतो, तो पूर्णतः काढून टाकला, की जे रसायन तयार होते त्याला इथेनॉल म्हणतात, त्याला मी 'शेतीतेल' असे नाव दिले आहे. शेतकऱ्यासमोर ही नवीन संधी उभी आहे. इतके दिवस इंधन तेलाच्या खाणीचे मालक म्हणजे अरब राष्ट्रातील शेख अशी सगळ्यांची कल्पना. आपल्या शेतातही इंधनतेलाचा झरा आहे आणि आपणसुद्धा अरब शेखांसारखेच पेट्रोलियम खाणींचे मालक आहोत हे समजले तर प्रत्येक शेतकऱ्याला आनंदच होईल. सरकार त्याचा शेतकऱ्यांना फायदा मिळू देत नाही याचे कारण आपण शोधून काढू; पण आपल्या शेतात असलेल्या तेलाचा फायदा कसा मिळवायचा ते समजून घेतले पाहिजे.
 'शेतीतेला'चे अर्थकारण
 'शेतीतेल' हे काही केवळ उसाच्या मळीतूनच निघते असे नाही. उसाच्या रसापासून ७५% इथेनॉल तयार होते. साखर कारखान्यातील मळीपासून ४०% इथेनॉल तयार होते. एवढेच नव्हे तर, कोणत्याही कृषिउत्पन्न बाजार समितीच्या बाहेर टाकून दिलेल्या सडक्या पालेभाज्या, फळभाज्या, जे काही टाकून दिलेले असेल त्या सगळ्यापासून इथेनॉल तयार होऊ शकते. या देशात अशा तऱ्हेने तयार होणाऱ्या इथेनॉलचा थेंब न् थेंब वापरला गेला तर शेतकरी समृद्ध होणार आहे. पण मनमोहन सिंगांच्या सरकारची इच्छा अशी की शेतकऱ्याच्या हातीच इथेनॉल जाता कामा नये, ते अरबांच्या हाती राहो.
 हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला साधा उपाय आहे. कोल्हापूरला २,३ जुलै रोजी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या 'इथेनॉल शिबिरात' एक कार्यक्रम ठरला.
 साखर कारखाने कोठे काढायचे यासंबंधी कायदे आहेत. त्यानुसार ऊस उपलब्ध आहे का, जवळचा कारखाना किती अंतरावर आहे अशा बाबी तपासल्या जातात. आता नवीन तरतूद करायला हवी की ज्या कारखान्यामध्ये इथेनॉल तयार होईल - किंवा नाही - असा कारखाना सबंध देशामध्ये कोठेही उघडण्यास मुभा राहील. त्याच्यावर कोणतेही बंधन असणार नाही. त्याकरिता ऊस वापरता येईल, शुगरबीट म्हणजे शर्कराकंद वापरता येईल, सगळा ओला कचरा वापरता येईल, काहीही वापरले तरी त्यातून तयार होणारा इथेनॉलचा प्रत्येक थेंब देशासाठी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८१