पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याचा काय भरवसा आहे? त्या प्रश्नाचं मी स्पष्ट उत्तर देत असे की, 'मला तुम्हाला फसवण्याचा मोह होणार नाही याची हमी मी देऊ शकत नाही; पण मी जर तुम्हाला फसवायचा प्रयत्न केला असं तुम्हाला वाटलं तर मला पायदळी घालून शेतकरी हिताचं काम तुम्ही शेतकरी संघटनेच्या मार्गाने करत राहावे एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे.'
 तेव्हा कोणी काही कोणाला न रुचणारं बोललं असेल तर तो शेतकरी संघटनेच्या लोकशाही तत्त्वाचा भाग आहे. तुम्हीसुद्धा बोलताना शेतकरीहिताच्या आचेपोटी बोललात, शेतकरी संघटनेच्या खरोखरच प्रेमापोटी बोललात, शरद जोशींच्या आदरापोटी बोललात का तुमच्याही मनात आणखी काही व्यक्तिगत पूर्वग्रह होता हेही एकदा तपासून पाहा. मला फक्त सगळ्या महाराष्ट्रातील, शेतकरी म्हणून सन्मानाने जगू इच्छिणारी निखळ प्रामाणिक माणसे हवी आहेत.
 कोणी कितीही म्हटले की शेतकरी संघटना संपली आहे, संपणार आहे, संपण्याचा धोका आहे तरी तशी ती संपणे किंवा कोणाला संपवता येणे शक्य नाही. कारण, शेतकरी संघटना म्हणजे केवळ लोकांची गर्दी नाही. शेतकरी संघटना हा एक विचार आहे. हा विचार इतिहासात कधीच नोंदला गेला आहे, तो आता कोणी पुसून टाकू शकत नाही. जेव्हा जेव्हा कधी शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर चर्चा होईल तेव्हा या शेतकरी आंदोलनाचा आणि या आंदोलनाने मांडलेल्या अर्थशास्त्राचा विचार त्यांना करावाच लागेल.
 पंचवीस वर्षांपूर्वी 'शेतीमालाला भाव मिळू न देणे हे सरकारचे धोरण आहे', 'शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण' अशा घोषणा शेतकरी संघटनेने दिल्या तेव्हा आम्हाला शिव्या देणाऱ्या सगळ्या लोकांपैकी जवळजवळ ८० टक्के लोक - त्यात अगदी मोठमोठे नेते, आज, आमची त्यावेळची विधाने जशीच्या तशी, अगदी घोकंपट्टी केल्याप्रमाणे, करीत फिरत आहेत. हा आपला विजय आहे. ही विधाने करताना ते, 'कॉपी राईट' मानून 'हे असे शरद जोशी पंचवीस वर्षापूर्वीच म्हणाले होते' असे म्हणत नाही ही गोष्ट खरी; पण आपण काही आपल्या नावाकरिता केले नाही. शरद जोशींना मोठे करायचे हा आपला उद्देश नव्हता. 'शेतकऱ्यांना इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने आणि सुखाने जगता यावे' - शरद जोशींच्या नावाखाली असे त्या प्रतिज्ञेत आपण कधी म्हटले नाही - हा आपला उद्देश होता. यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, इतरही कोणी करणार असतील तर त्यांनी त्यांच्या मार्गाने जावे. ओढा वहात असताना मधे एखादा मोठा दगड येतो. मग काही पाणी त्या दगडाच्या एका बाजूने जाते, काही दुसऱ्या बाजूने जाते; पण शेवटी सगळं पाणी जेथे वळण आहे आणि उतार आहे तेथेच येणार हे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६०