पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाकायचा असतो हा सभाशास्त्राचा नियम झाला; पण भावनेच्या भरामध्ये वकीलसुद्धा वकील राहत नाही आणि असा सभाशास्त्राला विपरीत ठराव मांडून 'अमक्यांचा निषेध करून त्यांना काढून टाकावे' असे मत असणारांनी हात वर करावेत असे आवाहन करताच सारासार विचार न करताच बहुतेकांनी हात वर केले. याच्या उलट प्रस्ताव मांडून आवाहन केले असते तर त्यालाही, कदाचित, सर्वांनी हात वर केले असते! दुसऱ्या वक्त्यांनी तर सगळी सभाच हाती घेतली - अध्यक्षबिध्यक्ष काहीच जुमानले नाही आणि जे असे निषेध विषय असतील त्यांनी बैठकीतून निघून जावे असे चक्क फर्मानच सोडले!
 मी शेतकऱ्यांची संघटना तयार केली. शिवाजी महाराजांनी जसे मावळामध्ये जाऊन जे राजकारणात नव्हते, आदिलशहाच्या दरबारात नव्हते, आदिलशहाच्या दरबारी जावे अशी ज्यांची बुद्धी नव्हती अशा मावळ्यांना स्वराज्यासाठी जमा केले तसेच शेतकरी संघटना बांधताना मी एकेक प्रामाणिक माणसाला शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी जमा केले. या माणसांनी संघटनेसाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, तुरुंगवास स्वीकारला, घरच्या लोकांच्या शिव्या स्वीकारल्या. त्यांच्या अनंत अनंत उपकारांच्या ओझ्याखाली मी आहे. त्यांच्या हातून जर एखादी चूक झाली तरी त्याला काढून टाकण्याचा अधिकार मला आहे असे मी मानीत नाही. जोपर्यंत त्याला शेतकऱ्याच्या भल्याचं काम करायचं आहे तोपर्यंत त्यानं ते करावं. ते कोणाच्या नेतृत्वाखाली करावं हे सांगण्याचा अधिकारही मला आहे असे मी मानीत नाही. तो जाणकार आहे; पण कोणाच्या मागे जावे हे ठरवण्यात चूक झाली तर आंदोलनालाच धोका पोहोचण्याची शक्यता असते. शेतकरी संघटनेच्या १९८० च्या नाशिक जिल्ह्यातील ऊस आंदोलनाच्या काळात घडलेला एक प्रसंग मुद्दामहून सांगतो. त्यावेळी नगर जिल्ह्यात एक समांतर शेतकरी संघटना उभी राहिली. आंदोलन ऐन भरात आल्यावर, गोळीबारात पोलिसांनी दोन-चार माणसे मारल्यावर या समांतर संघटनेच्या स्वयंभू नेत्यांनी जाहीर करून टाकलं की आम्ही हे आंदोलन मागे घेतलं आहे. काही काळ सगळीकडे गोंधळ, संभ्रम तयार झाला की खरंच आंदोलन संपलं की काय? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करा; पण, ज्यांच्या मागे तुम्ही जाता त्यांच्या निष्ठा आणि त्यांचा शेतकरी प्रश्नावरील अभ्यास तपासून घ्या. तुम्ही माझ्याच मागे या असं मी तुम्हाला कधी सांगितलं नाही.
 १९८० साली आम्हाला सभांमध्ये अनेक लोक प्रश्न विचारायचे की आतापर्यंत अनेक नेते आले आणि आम्हाला फसवून गेले; आमच्या जिवावर आमदार झाले, खासदार झाले, मंत्रीही झाले. तुम्हीही आम्हाला असं फसवणार नाही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५९