पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लक्षात ठेवा. आजवर आपल्याला जे जे लोक सोडून गेले आहेत त्या सगळ्यांचा जीव आता घुसमटून गेला आहे असं मला राजू शेट्टींनी आजही सांगितलं. तेव्हा त्यातील जी निखळ प्रामाणिक आणि निर्मळ मनाची माणसं आहेत ती आपल्या प्रवाहात येऊन मिसळणार आहेत याची मला खात्री आहे.
 १९८० साली, 'देशाची गरिबी हटविण्यासाठी शेतकऱ्यांची गरिबी हटवणे आणि शेतकऱ्यांची गरिबी हटविण्यासाठी शेतीमालाला रास्त भाव मिळवून देणे' असं सूत्र आपण मांडलं. त्यासाठी, शेतकरी संघटनेने कांद्याच्या भावाचं आंदोलन केलं, उसाचं केलं, तंबाखूचं केलं, दुधाचं केलं, कपाशीचं केलं, कर्जमुक्तीचं आंदोलन केलं आणि या सर्व आंदोलनांतून 'शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे' या मूळ संकल्पनेवरील माझी जी काही भाषणे माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांनी ऐकली, काही अंशी पाठही केली आणि लोकांसमोर करू लागले. लोकांच्या त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि संघटनेचा प्रसार वेगाने होऊ लागला; पण त्यांच्यातील काहींना वाटू लागले की, आपणही शरद जोशींसारखी भाषणे करू शकतो, आपण काय कमी आहोत? शरद जोशींच्या झेंड्याखाली जाण्याचे आपल्याला काय कारण आहे? त्यांनी वेगळे झेंडे उभारले. कोणी म्हणाले स्वाभिमानी, कोणी म्हणाले इमानी, कोणी म्हणाले मनमानी - काय असेल ते असो. त्याच्याबद्दल चिंता करण्याचे काय कारण आहे?
 १९८० साली शेतकरी संघटना ज्या प्रश्नावर उभी राहिली तो प्रश्न संपलेला नाही. आजही माझ्या मनावर मोठं ओझं आहे की सतत पंचवीस वर्षे कुटुंबाचा विचार न करता, इतर कशाचाही विचार न करता मी शेतकऱ्यांकरिता इतके कष्ट केले, त्यामध्ये माझ्या हजारो प्रामाणिक सहकाऱ्यांनी मला हात दिला त्या शेतकरी समाजामध्ये आजही आर्थिक दुरवस्थेपायी हजारो लोक आत्महत्या करीत आहेत. याची माझ्या मनाला मोठी सल आहे. दिवसरात्र ही खंत माझं मन पोखरीत आहे.
 शेतकऱ्यांची संघटना ही गोष्ट सोपी नाही. मार्क्सने शेतकऱ्यांच्या समाजाला 'बटाट्याचे पोते' अशी उपमा दिली होती. सगळे बटाटे एका पोत्यात घालून ठेवले तरी ते वेगळेवेगळेच राहतात. त्यांची एकी कधी होत नाही; पोत्याला जरा कोठे भोक दिसलं की बटाटे घरंगळून पडायला लागतात आणि वेगवेगळे पडतात. या शेतकऱ्यांमध्ये एकी करण्याचं काम आपण काही प्रमाणात केलं; पण दुर्दैवाने, त्यातूनही काही घरंगळून बाहेर पडतात. वाहत्या ओढ्यातील काही पाणी दगडाच्या वेगळ्या बाजूने गेले तर मुख्य प्रवाहाने चिंता करण्याचे काहीच कारण नाही; दुसऱ्या बाजूने गेलेले पाणी आड-वळणाने जात असेल तर ते

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६१