पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिकडे जाणार नाही आणि तिकडचे कोणी इकडे येणार नाही. संपला प्रश्न.
 व्यापारी आणि वाहतूकदार भावांनो, आंदोलनतंत्राचा तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला एक सल्ला देतो. जकातविरोधी समितीचे मुंबईचे आंदोलन चालू द्या. तुम्ही आता सगळ्या महानगरपालिकांना एकत्र करू नका. एकेका महानगरपालिकेला एकेकटे पाडा आणि समाचार घ्या. सांगलीचा निर्णय मुंबईला नाही, सांगली महानगरपालिकेने जकातकर घ्यायचा किंवा नाही हा निर्णय सांगलीलाच व्हायचा आहे. त्याचा संबंध सोलापूरशी नाही, कोल्हापूरशी नाही आणि मुंबईशीतर नाहीच नाही. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या काठ्या एकत्र बांधून त्यांची जुडी करून त्यांची ताकद का वाढवता? तुम्हाला सांगलीला पुढचा जकातविरोधी कार्यक्रम घ्यायचा असेल तेव्हा तो मुंबईच्या शासनाविरुद्ध घेऊ नका, सांगली महानगरपालिकेच्या विरोधात घ्या आणि तुमचे तिथे निवडून गेलेले लोक आहेत त्यांच्या मनात अशी धास्ती तयार करा की जर का जकात बंद झाली नाही तर पुढे त्यांना या महानगरपालिकेमध्ये निवडून येणे शक्य होणार नाही. हे तुम्हाला शक्य आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील सरकार या विषयावर बदलून आणणे शक्य नाही.
 राज्याचे सरकार बदलून आणणे शक्य नाही यामागे इतरही कारणे आहे. मागच्या निवडणुकीत त्यांनी सांगितले आम्ही जकात रद्द करू पण, तशी ती रद्द केली नाही. काय करू शकलो आपण? शेतकऱ्यांना सांगितले वीज फुकट देऊ, कर्ज बेबाक करू; शेतकरी खुश झाले आणि दिली मते भरभरून; पण वीज मोफत झाली नाही आणि कर्जवसुलीही थांबली नाही. शेतकरी आत्महत्येखेरीज काय करू शकले? निवडणुकीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणारे तुम्हीही बावळे आणि आम्हीही बावळे! तेव्हा जे सरकार काहीही घोषणा करून सत्तेवर येते आणि अंमलबजावणी करीत नाही त्या सरकारशी लढायला जाऊ नका, महानगरपालिकेशी लढा. महानगरपालिकेशी लढायचे म्हटले तर किती मोर्चे बांधावे लागतील? सांगलीच्या भोवती जितकी काही जकात नाकी असतील त्या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याइतकी शक्ती जर तुम्ही जमवली तर आठ दिवसांत येथील जकात बंद होईल. तुम्ही मुंबईवर चाल करून लढाई विनाकारण कठीण केली आहे आणि मुंबईच्या लोकांनी 'जकातीला पर्याय आम्ही शोधून काढतो' असे म्हणून तुम्हाला थोपवून धरले. पर्याय कसला देता? बायको माझ्या ताब्यात राहत नाही म्हणून बायकोला थोडेफार बोलायची परवानगी देता का?
 स्वतंत्र भारत पक्षाने हे जकातविरोधी आंदोलन नांदेडला घेतले, आज सांगलीला घेतले. जकातविरोधी समितीला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. पण त्याच लढाईसाठी आम्ही एक वेगळी आघाडी काढू इच्छितो की जी यापुढे राज्यशासनाशी लढणार

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५५