पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुंड म्हणू ख्यात आहे त्यांना ठेके देऊन वसुली करता? आणि महाराष्ट्रात हे घडले आहे की एका ठिकाणी ठेकेदाराच्या माणसांबरोबर जकातीबद्दल बाचाबाची झाली तर ठेकेदाराच्या माणसांनी त्याला गोळी घालून मारून टाकले. इन्कम टॅक्स देत नाही म्हणून गोळी घालून मारल्याचे कोणी ऐकले आहे? मग जकात देत नाही म्हणून मारण्याचा अधिकार या गुंडांना दिला कोणी? तेव्हा जकातवसुली हा केवळ आंतकवादी प्रकार आहे. मी एकनाथ ठाकुरांना सांगितले की, "जकातविरोधी समिती जे काही करते आहे ते योग्य आहे, त्यांना शासनाकडून जे काही काम करायचे आहे ते करा" आणि त्यांना मी ते सुचवले तेच येथील व्यापारी आणि वाहतूकदार भावांना सुचवू इच्छितो.
 सत्याग्रहाची आंदोलने चालवण्याचा माझा अनुभव प्रचंड आहे हे कोणीही मान्य करील. सत्याग्रहाचे आंदोलन यशस्वी कसे करावे याचे शास्त्र मी बनवले आहे. उदाहरणदाखल निपाणीच्या आंदोलनातील एक आठवण मी मुद्दामहून सांगतो. निपाणीला आंदोलनात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये कानडीभाषिक आणि मराठीभाषिक दोन्ही प्रकारचे लोक होते. पत्रकारांनी त्यांच्यात फूट पाडण्याकरता मला प्रश्न विचारला की, "बेळगाव कर्नाटकात राहावं का महाराष्ट्रात यावं याबद्दल तुमचं काय मत आहे?" त्यांचा कयास असा की मी जर 'कर्नाटकात जावं, असे म्हटले तर मराठीभाषिक शेतकरीनाराज होतील आणि कर्नाटकात राहावं म्हटले तर कानडीभाषिक नाराज होतील. मी त्यांना उत्तर दिले की, "कर्नाटकात जर शेतीमालाला रास्त भाव मिळणार असेल तर सगळा महाराष्ट्र कर्नाटकात घालायला मी तयार आहे." माझ्या या उत्तराला सर्व शेतकऱ्यांनी दाद दिली. बेळगावच्या 'तरुण भारत'चे संपादक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर तेथे हजर होते. ते मला म्हणाले, "मी तुम्हाला बेळगावला घेऊन जाणार आहे कारण तुम्ही आमच्या समितीला मार्ग दाखवू शकाल अशी मला खात्री वाटते." त्यांचे पुष्कळ नेते झाले. आचार्य अत्र्यांपासून बाळासाहेब ठाकऱ्यांपर्यंत अनेकांनी सीमाप्रश्नाचे धनुष्य उचलायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांच्या छातीवर ते धनुष्य पडले. मी एकीकरण समितीच्या बैठकीत गेलो आणि त्यांना मी एकच प्रश्न विचारला की, "तुम्हा बेळगावकरांना खरंच हा प्रश्न सुटावा अशी इच्छा आहे का?" माझा प्रश्न ऐकून सगळ्यांची तोंडे गोरीमोरी झाली. माझ्या असं लक्षात आले की त्यांना एकीकरणाचा प्रश्न सुटण्यापेक्षा हा प्रश्न धुमसत ठेवून त्यामुळे विधानसभेत ज्या पाच जागा मिळतात किंवा नगरपालिका जी हातात राहते त्याच्यात जास्त स्वारस्य होते; त्यांना प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नव्हते. नाहीतर मी त्यांना सांगणार होतो की, त्यात काय कठीण आहे? कर्नाटकाची आणि बेळगावची जी हद्द आहे तिथे आम्ही माणसे उभी करतो म्हणजे इकडचे कोणी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५४