पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. हा निर्णय हा सांगली महानगरपालिका क्षेत्राचा आहे, सोलापूर महानगरपालिका क्षेत्राचा आहे. ही आघाडी एकेका महानगरपालिका क्षेत्राची लढाई लढवील. ताकद असली तर एका वेळी दोन क्षेत्रांत लढाई लढू. एकाच महानगरपालिका क्षेत्रामध्ये या आघाडीची सर्व ताकद एकवटून, महानगरपालिकेला त्यांच्या जकात नाक्यांवर वाहने अडवून जकात वसुली करणे अशक्य होईल अशा प्रकारचे आंदोलन आपण घेऊ शकतो.
 व्यापारी व वाहतूकदार भावांना शेवटी एक मुद्दा मला सांगायचा आहे. हे आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाने घेतले आहे. शेतकरी संघटना ही गोष्ट वेगळी. शेतकरी या आंदोलनात आले कारण स्वतंत्र भारत पक्षाला शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे आणि शेतकरी संघटनेला स्वतंत्र भारत पक्षाचा पाठिंबा आहे; परंतु स्वतंत्र भारत पक्षाने घेतलेली ही भूमिका केवळ जकातकराबद्दल नाही. देशातील सर्व करव्यवस्थेबद्दल स्वतंत्र भारत पक्षाने एक मांडणी केली आहे. व्यापारी मंडळींनी आता काही मुद्दे ऐकून घ्यावेत व नंतर स्वतंत्र भारत पक्षाचा जाहीरनामा तपशिलाने वाचावा. या विषयातील पहिले कलम असे की कोणतीही कर आकारणी हिशोबाच्या वह्यांच्या आधाराने केली जाणार नाही. हिशोबांच्या वह्यांचा आधार घेतला की त्या खोटेपणाला वाव मिळतो, कोणा इन्स्पेक्टरला किती डिस्क्रीशन आहे हे बघता येते आणि मग तो पैसे खातो. जे काही कर द्यायचे ते त्या माणसाचे घर किती मोठे आहे, त्याचे उत्पादनाचे क्षेत्र किती मोठे आहे, त्याचे उत्पादन किती होते, तो वीज किती वापरतो, पेट्रोल किती वापरतो आणि कचरा किती टाकतो यावर आधारलेले असावेत म्हणजे हिशोबाच्या वह्यांच्या जुळवाजुळवीत जो काही भ्रष्टाचार होऊ शकतो त्यातून सुटका होईल.
 स्वतंत्र भारत पक्ष 'आहे रे' आणि 'नाही रे' या वाह्यात कल्पनेवर विश्वास ठेवीत नाही. आमचा कार्यक्रम आहे 'पोशिद्यां'ची लोकशाही स्थापन करण्याचा. शेतकरी पोशिंदा आहे, व्यापारी पोशिंदा आहे, वाहतूकदार पोशिंदा आहे. त्या पोशिंद्याच्या जे हिताचे असते ते देशाच्या हिताचे असते. इथे महात्मा गांधीच्या एका तत्त्वाला विरोध होतो आहे. ते म्हणायचे, "जो सगळ्यात दीनदुबळा असेल त्याच्या हिताचे पाहा." या महामंत्राचा प्रयोग गेली पन्नास-साठ वर्षे झाला; पण त्यातून काही निघाले नाही. कारण, जो कमजोर आहे, दुबळा आहे त्याला कितीही दिले तरी त्यातून देशाचे काही भले होत नाही. जो पोशिंदा आहे, जो निदान एका माणसाला तरी रोजगार देतो त्या माणसाच्या दृष्टीने भले काय आहे ते पाहा. म्हणजे खऱ्या अर्थाने उद्योजकांची, ज्यांच्या अंगात धडाडी आहे, हिंमत आहे, जे धोका पत्करायला तयार असतात आणि व्यापारउदीम करू शकतात, जे महिन्याला मिळणाऱ्या पगाराच्या आशेवर

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५६