पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही पण, तरीही जयपालअण्णांनी माझ्यावर जेवढे प्रेम केले तेवढे फार थोड्या लोकांनी केले आहे. त्यांच्या खूप नंतर संघटनेत आलेले पुष्कळ लोक संघटनेच्या अध्यक्षपदी राहून गेले. आज मला मोठा आनंद होतो की सांगलीमध्ये, संघटनेच्या अत्यंत कठीण प्रसंगी, जेव्हा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे आणि महाराष्ट्रभरसुद्धा जे जे थोडेफार इकडेतिकडे पांगले आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून जागतिक व्यापार संस्था, जैवतंत्रज्ञान, वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता अशा कालखंडामध्ये शांतपणे विचार करून सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालणारा नेता जयपालअण्णांच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे आणि जयपालअण्णांना मी शब्द देतो की सुरुवातीच्या काळात वसंतदादांच्या बाबतीत त्यांनी सांगितलेले मी ऐकले नसले तरी या काळात तुम्ही अध्यक्ष म्हणून जे काही सांगाल ते मी प्रमाण मानीन.
 आजचा हा कार्यक्रम ज्या प्रश्नासाठी - जकातीच्या प्रश्नासाठी - होतो आहे त्या प्रश्नावर बोलण्याआधी इतके सगळे बोललो ते यासाठी की आज हा जो काही संगम होतो आहे तो काही साधा नाही. हा संगम व्यापाऱ्यांनी घडवून आणला आहे; नाही तर हा प्रसंग इथे घडत नव्हता.
 ऑक्ट्राय म्हणा, जकात म्हणा, चुंगी म्हणा. हा काय प्रकार आहे. सगळ्या लोकांचे एकमत आहे की एक रुपया कमावण्याकरिता दहा रुपये खर्च करणारे आणि ज्यामध्ये वाहतूक जागोजाग खोळंबली जाते, इंधन मोठ्या प्रमाणावर नाहक जाळले जाते, पर्यावरणात प्रचंड प्रदूषण होते अशा तऱ्हेचे हे कराचे प्रकरण आहे. अर्थव्यवस्थेला हानिकारक असे हे प्रकरण चालू राहिले आहे त्याचे एकमेव कारण आहे. इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स यांसारखे कर हे हिशोबी असतात, ते चेकने भरले जातात किंवा त्या संबंधित खात्याच्या हिशोबात नोंदले जातात. तिथे जाऊन कोणी आमदार-खासदार त्या हिशोबात हात घालू शकत नाही: पण जकात नाक्यावर जर कोणीही आमदारासारखा पुढारी गेला तर तेथील गल्ल्यातील रोकड उचलू शकतो हे एकमेव कारण जकात चालू राहण्यामागे आणि ती चालू ठेवण्याच्या धडपडीमागे आहे.
 जकातविरोधी आंदोलन खूप काळापासून सुरू आहे पण अजून काही आशेचा किरण दिसत नाही. मला असे वाटते की, या आंदोलनाची दिशा चुकलेली आहे. या बाबतीत मी या जकातविरोधी आंदोलनाचे सेनापती खासदार एकनाथ ठाकूर, बिंदुमाधव जोशी यांच्याशी बोललो आहे. आपण हे आंदोलन सरकारच्या विरोधात चालवले आहे आणि सरकार काही हलायला तयार नाही. माझा प्रश्न असा आहे की या जकातकराचा आणि सरकारचा संबंध काय? कायद्याने महानगरपालिकांना परवानगी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५२