पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे.
 शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी जयपालअण्णा फराटे
 जकातीच्या प्रश्नावर बोलायला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक संघटनात्मक मुद्दा पुरा करतो. राजू शेट्टी येथे आले पण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष काही येथे आले नाही अशी कुजबुज मी ऐकली, काही वर्तमानपत्रांत वाचली. रघुनाथदादा पाटील इथे नाहीत ही गोष्ट खरी आहे; पण काल संध्याकाळपासून ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नाहीत. काल झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सांगली भागामध्ये, विशेषतः ऊस आंदोलनाच्या संबंधाने रघुनाथदादांनी जे नेतृत्व दाखवले, काम केले, तुरुंगात गेले, मार खाल्ला त्याची कृतज्ञतापूर्वक नोंद घेऊन त्यांचे आभार मानण्याचा ठराव झाला; पण त्यांची एक वर्षाची कालमर्यादा संपत आल्यामुळे आणि आज जो काही नव्या प्रश्नांचा कालखंड येतो आहे त्या कालखंडामध्ये सर्वांना सामावून घेणाऱ्या, आमच्यापासून दूर गेलेल्यांनासुद्धा एकत्र करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे म्हणून या बैठकीत नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आणि नव्या अध्यक्षपदी आपल्या कांद्याच्या आंदोलनापासून माझे सहकारी असलेले आणि ज्यांनी मला पहिल्यांदा सांगलीला आणले त्या जयपाल अण्णा फराटे यांची एकमताने निवड करण्यात आली.
 जयपाल अण्णांच्या निवडीचे सर्वांनी जे स्वागत केले त्याचे कारण त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि शेतकरी संघटनेच्या तत्त्वांबद्दलची त्यांची निष्ठा. मी कांद्याचे आंदोलन सुरू केले तेव्हा हिंदुस्थानात येऊन मला पाच वर्षे झाली होती आणि शेतीच्या प्रयोगामुळे घरची परिस्थिती ओढगस्तीची होऊन आज टेबल वीक, उद्या खुर्ची वीक अशा पद्धतीने घर चालवत होतो. कांद्याच्या आंदोलनाची जाहिरात खूप झाली आणि जयपालअण्णा माझ्या घरी मला भेटायला आले आणि परत जाण्याच्या आधी, माझ्यापेक्षा ते पाच वर्षांनी लहान आहेत तरी, त्यांनी माझ्या बायकोला विचारले की शेतकरी आंदोलन, तुरुंगवास वगैरे ठीक आहे, पण घरच्या खर्चाची काही व्यवस्था आहे का? आणि त्या माणसाने काही न बोलता, मला आजही आठवते आहे, माझ्या बायकोच्या हाती १००० रुपये (त्या काळचे) काढून दिले. सांगलीला जेव्हा मला ते घेऊन जात तेव्हा त्यांना मोठी काळजी वाटायची. कारण, त्या काळी माझी भाषणे कडक असायची. सांगलीसारख्या भागात उसाच्या प्रश्नावर बोलायचे म्हणजे तेथील शेतकऱ्यांचे दैवत वसंतदादा आणि शालिनीताई यांच्यावर कडक टीका करणे अनिवार्य होते; पण जयपालअण्णांचा स्वभाव मृदू, ते मला व्यासपीठावर चढायच्या आधी बाजूला घेऊन म्हणायचे, “साहेब, तुम्ही सांगलीत बोलताहात, दादांच्याबद्दल एवढं कडक नका बोलू." त्यांचे मी ऐकले

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५१