पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकऱ्याला 'भीक नको', एक दाणा पेरून हजार दाणे पिकवण्यासाठी गाळाव्या लागणाऱ्या 'घामाचे दाम' फक्त पाहिजे ही घोषणा शेतकरी संघटनेने दिली. त्या वेळी जे अर्थशास्त्र सांगितले गेले त्याला नावे ठेवणारे खूप होते. उदाहरणार्थ, शरद पवार. त्यांनी म्हटले होते की, उसाला जर ३०० रुपये टनाचा भाव दिला तर सगळे साखर कारखाने मोडीत काढावे लागतील. तेच शरद पवार आज शरद जोशींचीच भाषणे देत सबंध देशभर फिरताहेत. जी भाषा, जे अर्थशास्त्र, अर्थव्यवस्थेचे व्याकरण त्या वेळी आम्ही मांडले तेच आज सबंध हिंदुस्थानातले पुढारी वापरू लागले आहेत; एवढेच नव्हे तर, जागतिक व्यापार संस्थेचे करारसुद्धा त्या भाषेच्या आधाराने तयार झाले आहेत.
 पण, आज जर असे कोणी समजून चालेल की त्याच भाषणांनी, त्याच आंदोलनांनी आणि त्याच हत्यारांनी शेतकरी आंदोलन चालणार आहे तर ते खरे नाही. शेतकऱ्यांपुढे फार वेगळे प्रश्न उभे राहत आहेत. जागतिक व्यापार संस्था हा एक छोटा प्रश्न झाला, नवीन जैवतंत्रज्ञानाने बनणारे बियाणे हा एक वेगळा प्रश्न झाला, पण सगळ्या जगाला सर्वात अधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे जगाचे वाढणारे तापमान. जगाच्या वाढणाऱ्या तापमानाचे परिणाम काय होतील? हिंदुस्थानामध्ये अन्नधान्य पिकणे जवळजवळ अशक्य होईल आणि सगळे अन्नधान्य आताच्या थंड प्रदेशांत म्हणजे सैबेरियासारख्या देशांतच पिकेल. लोकांना प्यायला पाणी पुरणार नाही तेथे शेतीला पाणी देणार कोण? इतके विचित्र प्रश्न नजीकच्या भविष्यकाळात शेतीसमोर उभे राहणार आहेत. याच्यासंबंधी चिंतन करण्याची ज्यांची ताकद आहे, ज्यांचा व्यासंग, अभ्यास आणि निष्ठा आहे तीच मंडळी याच्या पुढील शेतकरी आंदोलन चालवू शकतील. जुन्या शब्दप्रयोगांच्या आणि जुन्या व्याकरणाच्या शेतकरी आंदोलनाला याच्यापुढे अर्थ उरणार नाही.
 आपला एखादा आवडता, काम करणारा, कर्तबगार मुलगा घरातून दूर झाला आणि त्याने वेगळी चूल मांडली - त्याच्या बायकोच्या हट्टामुळे का असेना - की बापला मोठे दुःख होते आणि राजू दूर गेल्यामुळे मला दुःख झाले हे काही मी कधी लपवून ठेवले नव्हते. आजचा दिवस शुभ दिवस आहे आणि मला आनंद वाटतो की आता या भिंती तुटायला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर, काल मी न मागता राजूने मला एक आश्वासन दिले आहे. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ, राजकारण मी मनात बाळगलेले नाही, शेतकरी संघटना हे कुटुंब आहे आणि शेतकरी संघटनेचे पाईक म्हणजे माझी मुले आहेत असे मी धरून चाललो तरीदेखील, दुर्दैवाने, आज कोणाच्या मनात काही आले तो दूर झाला, उद्या आणखी कोणी, अशा सगळ्यांना एकत्र करून त्यांना पुन्हा शेतकरी संघटनेत आणण्याचा तो स्वतः प्रयत्न करणार

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५०