पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहणीमान आणि गावातील राहणीमान यांमध्ये जो फरक आहे त्याचा तो परिणाम आहे आणि शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाही याचे कारण शेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव मिळता कामा नये असे सरकारचे धोरण आहे हे शेतकरी संघटनेने सप्रमाण सिद्ध करून सांगितले. शेतकरी संघटनेने पहिल्यांदा सांगितले की, शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा खरा शत्रू सरकार आहे. जर शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला तर व्यापाऱ्याचा ग्राहक वाढेल, व्यापार तेजीत येईल; शेतकऱ्याला जर पैसे मिळाले तर व्यापाऱ्यांची देणी दिली जातात हा अनुभव आम्ही १९८० सालापासून घेतला आहे. शेतकरी संघटनेने 'रास्ता रोको' हे हत्यार जेव्हा घेतले तेव्हा व्यापाऱ्यांनी आणि वाहतूकदारांनी आम्हाला साथ द्यावी असा आम्ही फार प्रयत्न केला. त्यांनी त्यावेळी जर आम्हाला साथ दिली असती तर, २७ शेतकरी या आंदोलनात जे बळी पडले त्यातील एकाही शेतकऱ्याचा बळी गेला नसता. ही एकी त्यावेळी जमली नाही, ती आज एका व्यापक आघाडीकरिता जमते आहे हे मोठे भाग्य आहे.
 आपल्याला केवळ जकातीची लढाई लढायची नाही, मी तुमच्या बरोबर आलो आहे, शेतकरी येथे तुमच्याबरोबर आले आहेत, राजू शेट्टी आणि त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही आपल्याबरोबर आले आहेत ते त्याहून मोठ्या लढाईची आखणी करण्याच्या निर्धाराने. काल काही पत्रकारांनी मला विचारले की, 'स्वाभिमानी' शब्द राहणार की नाही? मी म्हटले, "ते नाव ठेवायचे किंवा नाही तो निर्णय स्वाभिमानी संघटनेने करायचा आहे." आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भिंत ओलांडून राजू आणि त्याचे सहकारी इकडे आले. मला वाईट एवढेच वाटले की गुरुपौर्णिमेच्या मुहूर्ताची वाट न पाहता दुधाचे आंदोलन ज्या दिवशी त्यांनी जाहीर केले त्या दिवशी मला त्यांनी साधा फोन केला असता तर त्यांच्या आंदोलनात सामील होण्याकरिता मीसुद्धा आलो असतो. दर्यापूरच्या निवडणुकीच्या वेळी, मनात कोणताही मानापमान न ठेवता, मदतीला या म्हणून मी त्यांना विनंती केली होती. तसेच स्वाभिमानीच्या एका जरी कार्यकर्त्याने म्हटले असते की, "१९८० साली दुधाचे आंदोलन तुम्हाला तसेच सोडावे लागले, आता हे शिवधनुष्य आम्ही उचलायचे ठरवले आहे, आमच्या मदतीला या," तर मी नेतृत्वाची काही अपेक्षा न बाळगता धावून आलो असतो. आता या भिंती ठेवायच्या किंवा नाही हे त्यांनी ठरवायचे आहे. त्यांच्या मागे 'स्वाभिमानी' हे नाव असले तरी त्यांच्या छातीवरील बिल्ला अजून शेतकरी संघटनेचाच आहे, त्यात काही बदल झालेला नाही.
 काल राजूशी बोलताना मी एक गोष्ट सांगितली ती सर्व शेतकरी भावांना सांगतो. १९८० साली, तोवर शेतकऱ्यांना फक्त भीक मागण्याची आंदोलने चालू असताना,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४९