पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे असे ते म्हणतात आणि त्यांच्या 'आम आदमी'ची व्याख्या करताना ते म्हणतात, की हिंदुस्थानातले दलित, हिंदुस्थानातले मुसलमान हे मागास आहेत, शोषित आहेत आणि त्यांच्याकरिता सरकारला जास्तीत जास्त न्यायाची आणि उद्धाराची कामगिरी करायची आहे. असा हा २००५ सालचा विचार आहे. १९८० साली शेतकरी शोषित आहेत असं सर्वजण म्हणत होते. आज २००५ साली अधिकृत विचारसरणी अशी बनली आहे की या देशात शोषित कोण असेल तर ते दलित आणि मुसलमान आहेत. त्याला तशी काही हरकत नाही. कारण ज्याची भुकेकंगाल अवस्था अधिक त्याची भूक प्राधान्याने भागवली पाहिजे; पण अशी विचारसरणी असण्यात एक अडचण तयार होते.
 १९८० साली शेतकरी समाज शोषित आहे म्हणताना जन्माने शेतकरी असलेला मनुष्य शोषित असे कधी म्हटले नाही. आम्ही मुसलमान शेतकरी शोषित आहे, मराठा शेतकरी शोषित आहे असे म्हटले नाही. ज्याचे ज्याचे पोट शेतीवर अवलंबून आहे तो तो शेतकरी आहे आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांचे शोषण होते आहे असे आम्ही म्हटले. शेतकरी कोण जन्माच्या आधाराने ठरत नाही हे मी वारंवार सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या घरी जन्माला आला पण मुख्यमंत्री झाला आणि मुंबईत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील गालिच्यावर त्याची पावले पडू लागली की, शेतकऱ्याच्या गळ्याला दावे बांधून त्याला कसाईखान्याकडे कसे न्यावे याचा विचार तो करू लागतो, तो शेतकरी राहत नाही. १९८३ साली पंढरपूरला झालेल्या साकडे मेळाव्यात आपण विठोबाला साकडे घातले होते की, 'बा रखुमाईवरा, विठ्ठला, शेतकऱ्यांना एवढेच दान दे की शेतकऱ्यांच्या या पोरांना बुद्धी येवो'. या शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतकऱ्यांचं जितकं नुकसान केलं, तितकं दुसऱ्या कोणीही केलं नाही. त्यामुळे, शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचं कल्याण करतो हे काही खरं नाही. शेतकरी जातीनं ठरत नाही, तर ज्याचं पोट शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी अशी व्याख्या शेतकरी संघटनेने केली. शोषित वर्ग कोण आणि शोषक वर्ग कोण हे शेतकरी संघटनेने जन्माच्या आधारावर ठरवलं नाही; पण हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेला हसणारे काँग्रेसचे लोक, सोनिया गांधी आणि संपुआचे सरकार आता शोषितांचे अर्थकारण मांडण्याऐवजी शोषितांचे समाजकारण मांडायला लागले आहेत. अमक्या अमक्या जातींत, धर्मांत जन्मलेले सगळे शोषित आणि वरच्या जातीत जन्मलेला कितीही दरिद्री, गरीब असला, त्याला खायची भ्रांत असली तरी त्याला आम्ही शोषित मानणार नाही अशी या मंडळींची विचारधारणा बनली आहे. थोडक्यात, जन्माच्या आधाराने शोषणाची कल्पना मांडणाऱ्या विचाराचे विषारी बीज येथे रुजविले जात आहे. आम्ही १९८० साली शेतकरी संघटना बांधताना 'शोषित कोण' हे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २१७