पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मांडताना जन्माचा आधार घेतला नाही, त्याच्या व्यवसायाचा, कामाचा आधार घेतला; त्या पलीकडे, समाजवादाला विरोध करतानादेखील सिद्धांतात खोल जाऊन आम्ही एक आर्थिक सिद्धांत मानला की दहा लोक एकत्र बसून त्यांनी जर सामूहिक निर्णय करण्याचा प्रयत्न केला तर तो चुकीचाच असतो. अर्थशास्त्रात याला 'ॲरोचा सिद्धांत' म्हणतात. उदाहरणार्थ, पंचायतीत पाचलोक बसतात, 'पाचामुखी परमेश्वर' या न्यायाने हे पाच लोक गावाचे भले करतील अशी साऱ्यांची कल्पना असते. पण प्रत्यक्षात काय होते? जो तो पंच आपला आणि आपल्या लोकांचा स्वार्थ कसा साधता येईल याचाच विचार करतो आणि त्यातल्या त्यात जो दांडगा असतो तो पंच बाकीच्या लोकांना आपले म्हणणे मान्य करायला भाग पाडतो आणि मग जो काही निर्णय होतो तो संपूर्ण गावाच्या भल्याचा होऊच शकत नाही. थोडक्यात, सामूहिकरीत्या बलदंडांचा निर्णय घेतला म्हटले तरी तो सामूहिक निर्णय नसतो, त्या समूहातील इतर सर्वांवर लादलेला निर्णय असतो असा ॲरोच्या सिद्धांताचा अर्थ.
 समाजवादी रशिया पूर्वी प्रबळ महासत्ता होती. कारण, साम्राज्यवादी आपल्या बोल्शेव्हिक राजवटीवर हल्ला करतील अशी सतत भीती वाटत असल्याने रशियन नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची जबर भावना होती. तेथील कामगारांनी उत्पादनांचे अजब अजब चमत्कार घडवून आणले. याच राष्ट्रवादाच्या भावनेच्या बळावरच समाजवादी रशियाने हिटलरचे आक्रमण मोडून काढून त्याचा पराभव केला; पण हा विजय मिळविल्यानंतर शांततेच्या काळामध्ये, राष्ट्राचा विकास करण्यासाठी तेथेसुद्धा नियोजन मंडळे बसायला लागली. त्यांच्या सामूहिक निर्णयाला 'ॲरोचा सिद्धांत' लागला आणि युद्ध संपल्यानंतर पन्नास ते साठ वर्षांच्या आत रशियातील, एके काळी प्रचंड ताकदवान असलेल्या, समाजवादी राजवटी खालील रशियाच्या सोविएट युनियनचा डोलारा कोसळून पडला.
 तेव्हा, सामूहिक निर्णय ही कल्पनाच चुकीची आहे, व्यक्तीचा निर्णय हाच खरा निर्णय. एखाद्या व्यक्तीला लाडू आवडतो याचा अर्थ तो घरातल्या सगळ्यांना आवडतोच असा होत नाही. प्रत्येक माणसाची चव वेगळी असते, प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे त्या, त्या प्रकृतीप्रमाणे वेगळा वेगळा निर्णय होणे साहजिक ठरेल.
 जितकी माणसे तितक्या प्रकृती. अशी वेगवेगळ्या प्रकृतीची माणसे एकत्र आली म्हणजे त्यांच्यामध्ये जी काही निवड व्हायची ती जेथे होते त्या जागेला 'बाजारपेठ' म्हणतात आणि अशा तऱ्हेने वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या लोकांच्या प्रतिक्रियांनी जे निर्णय होतात तेच सर्वांत कार्यक्षम असतात. हीच भूमिका शेतकरी संघटनेने मांडली.
 आजही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग म्हणा किंवा वित्तमंत्री पी. चिदंबरम् म्हणा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २१८