पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे, पण १९९१ साली त्याला उतरती कळा लागली आणि स्वातंत्र्याच्या सूर्याचा उदय होतो आहे असे वाटायला लागले.
 पण, समाजवाद संपायला लागला तेव्हा प्रस्थापित पुढाऱ्यांचा गरिबी हटविण्याचा धंदाच बंद पडला. मग आता करायचे काय असा राजकारणातील हौसे, गवसे, नवसे मंडळींपुढे प्रश्न उभा राहिला. मग, त्यांच्यापैकी कोणाला अयोध्येचं मंदिर सापडलं, कोणाला शिवाजी महाराजांची एकदम आठवण झाली, आणखी काय, काय! १६ जानेवारी १९८८ रोजी शेतकरी संघटनेचा सांगली येथे मेळावा झाला, त्यावेळी मी शेतकऱ्यांना सांगितले की, 'बळिराज्य येते आहे, पण त्याच्याबरोबर जातीयवाद्यांची गिधाडेही उठली आहेत, तीही नुसती नाही - हिरवी, निळी, पिवळी, भगवी - झाडून सगळ्या रंगांची गिधाडे. शेतकऱ्याच्या - बळिराजाच्या हातचा घास ही गिधाडे घेतील, त्यांच्यापासून सावध राहा'. या गिधाडांच्या हल्ल्यामुळे सगळ्या देशापुढचा आर्थिक कार्यक्रम संपला.
 आता यापुढे शेतकरी संघटनेची मार्गक्रमणा कशी असावी हे ठरवायचे असेल तर १९८० साली शेतकरी संघटना स्थापन झाली त्या वेळची देशाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यातील फरक कसा कसा होत आला हे समजावून घ्यायला हवे.
 ८० च्या दशकाच्या मध्यात रामाचा घोडा सुटल्याबरोबर काही लोकांनी शुंबकाचा घोडा सोडला आणि राम जर तपस्या करणाऱ्या दलित शंबुकाची मान कापून टाकत असेल, त्याने शबरीची उष्टी बोरे एकदा खाल्ली हा मुद्दा सोडून द्या, तर 'अयोध्येला' आणि 'शिवाजी'ला काटशह देण्याकरिता 'शंबुका'चा झेंडा उभारला पाहिजे, दलितांच्या ऐक्याचा झेंडा उभारला पाहिजे असे काही लोकांना वाटायला लागले. डॉ. आंबेडकरांनी दलितांची एकी व्हावी अशी कल्पना किती भव्य मानवतेच्या भावनेने मांडली; पण त्यांच्या वारसदारांनी मात्र राखीव जागांच्या आधाराने दलितांच्या उद्धाराच्या नावाने एक वेगळेच राजकारण चालू केले. सगळीकडे जातीयवादाचा विचार होऊ लागला. आम्हा दलितांच्या मदतीशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही अशी भाषा सुरू झाली. आज तर उत्तरेत, विशेषतः बिहार आणि बंगालमध्ये ही भाषा राजरोस वापरली जाऊ लागली आहे. बिहारमध्ये लालुप्रसादांनी उघड उघड म्हटले की आम्ही मुसलमान आणि यादव अशी एकी करून निवडणूक जिंकणार आहोत. म्हणजे, 'रामा' ला काटशह देण्याकरिता दलित आंदोलन उभं राहिलं, इस्लामचं आंदोलन उभं राहिलं आणि इस्लाम आणि दलित एकत्र होऊन लढू पाहात आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या सरकारच्या आधाराने मोठे विचित्र सिद्धांत ही मंडळी मांडू लागली आहेत. काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा हा 'आम आदमी'साठी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २१६