पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जगण्यासाठी जे स्वातंत्र्य आवश्यक आहे त्या स्वातंत्र्याचे हे बियाणे आहे. ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत शेतकरी संघटना लढत राहील आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी अखंड लढणारी अग्रणी संघटना म्हणून तिचे नाव इतिहासात नोंदले जाईल. आज ज्या माणसांची नावे अग्रभागी दिसतात - मग ती दिल्लीतील सत्तेमुळे असोत की मुंबईतील किंवा आणखी कशामुळे - त्यांचे नावसुद्धा इतिहासात शिल्लक असणार नाही अशावेळीसुद्धा शेतकरी संघटनेचे नाव इतिहास अग्रभागी राहील.
 ९८० मध्ये जेव्हा शेतकरी संघटनेची सुरुवात झाली तेव्हा शेतकऱ्यांची संघटना असूच शकत नाही, 'एकवेळ कुत्र्याचे शेपूट सरळ होईल पण शेतकऱ्यांची संघटना जमणार नाही' असे थोर थोर बुद्धिवंत आणि 'लोकनेते' मला ठिकठिकाणी सांगत आणि माझ्यासारख्याला तर ते कधीच जमणार नाही असेही सांगत, कारण माझ्याइतका, शेतकऱ्यांची संघटना बांधायला, अपात्र कोणीच असू शकत नाही! कारण, मी काही शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो नाही, आमच्या कित्येक पिढ्यांत कोणाच्या नावावर इंचभरसुद्धा जमीन नाही. दुसरे कारण, मी ब्राह्मण आणि ब्राह्मणांनीच शेतकऱ्यांना आजपर्यंत लुटले हा सरधोपट सिद्धांत. आणखी एक म्हणजे बरीच वर्षे परदेशात राहिलो म्हणून मराठीत बोलणे विसरलेला – इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषाच काय त्या येतात. मग, शेतकऱ्यांना कसे समजावणार? थोडक्यात, शेतकऱ्यांची संघटना बांधण्याचे काम अत्यंत कठीण, कुत्र्याचे शेपूट सरळ करण्यापेक्षासुद्धा कठीण आणि हे काम करायला घेतलेला मी सर्व व्यावहारिक दृष्टींनी या कामाला अपात्र. तरीसुद्धा आज समोर दिसणारे हे जे संघटनेचे स्वरूप आहे यातच शेतकरी संघटनेच्या विचाराचे महत्त्व कळून येते.
  त्यावेळी, लोकांची कल्पना अशी होत की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या, पंजाब हरयाणातल्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या, राज्याराज्यांतल्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या; बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या, जिराईत शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या, ऊसवाल्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या, कापूसवाल्यांच्या वेगळ्या, धान्यवाल्यांच्याही वेगळ्या. पाणीवाल्यांच्या वेगळ्या, कोरडवाहूंच्या समस्या वेगळ्या, सगळेच कष्टकरी आणि समस्याग्रस्तही; पण या वेगवेगळ्या प्रकारांमुळे सगळे शेतकरी चार वेगवेगळ्या दिशांना तोंडे करून उभे होते. अशी सर्व शेतकरी समाजाची परिस्थिती त्यावेळी होती. डाव्या नेत्यांचे तर म्हणणे असे होते की शेतकरी संघटना ही कल्पनाच चुकीची आहे, कारण शेतकऱ्यांमध्ये मोठे शेतकरी हे शोषक आहेत आणि लहान शेतकरी हे शोषित आहेत, शेतमजूरही शोषित आहेत. त्यामुळे खरा संघर्ष व्हायचा असेल तर गावांमध्ये विटांच्या घरांमध्ये राहणारे शेतकरी आणि झावळ्यांच्या झोपड्यांमध्ये राहणारे शेतकरी व शेतमजूर

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २१२