पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अर्थशास्त्री शेतकरी संघटनेच्या अर्थविचाराची हेटाळणी करीत, अशावेळी शंकरराव आपल्या समयसूचक बोलण्याने मोठा धीर देत. महाराष्ट्र टाइम्सने तर शेतकरी संघटनेवर सतत हल्ला करण्याचा विडा उचलला होता; पण शंकरराव नेहमी म्हणत, 'जोपर्यंत महाराष्ट्र टाइम्स आपल्याबद्दल विपरीत लिखाण प्रसिद्ध करीत आहे तोपर्यंत आपण योग्य मार्गानेच चाललो आहोत याची खात्री बाळगावी.' छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेसाठी जसे मावळे मिळाले तसेच शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू करताना शेतकरी संघटनेला मावळे मिळाले. आणखी एक नाव आवर्जून समोर येते ते 'योद्धा शेतकरी' चे लेखक विजय परूळकर यांचे. आज जर का हा सोहळा पाहायला ते इथे हजर असते तर समोरचा जनसागर पाहून त्यांचे डोळे भावनेने भरभरून आले असते आणि ते पाहून मला जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले असते. नागपूरच्या अधिवेशनात ते आले होते आणि तेथील कस्तुरचंद पार्कवरील प्रचंड गर्दी पाहून अवाक झाले होते. आजचा हा सोहळा पाहून ते म्हणाले असते, 'योद्धा शेतकरीच्या पाभरीतून जे इवलेसे बीज पेरले गेले त्या योद्धा शेतकरीच्या वाचनातून शेकडो हजारो शेतकरी कार्यकर्ते तयार झाले. त्यावेळी लावलेला वेल मोठा होऊन असा 'गगनावरी' गेला.'
 अशी किती किती नावे या क्षणी समोर येतात ती घेत गेलो आणि त्यांच्या आठवणी सांगत बसलो तर आजचा दिवसच काय, सप्ताह केले तरी पुरे पडणार नाहीत.
 व्यासपीठावर येण्याआधी गुणवंत पाटलांनी लावलेले 'मजल' चित्रप्रदर्शन पाहायला गेलो होतो. ते पाहाताना गेल्या पंचवीस वर्षांतील अनेक आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. आजच्या गोदातीर समाचारच्या पहिल्या पानावर संपादकांनी 'शेतकरी संघटना कोठून कोठे गेली याचे या रौप्यमहोत्सवप्रसंगी चिंतन करावे' असे लिहिले आहे. इतर लोक काय चिंतन करतात कोण जाणे? आपण मात्र चिंतन करणार आहोत गंभीरपणे. या मेळाव्याच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात मी म्हटले आहे की, "आज शेतकरी संघटनेचा पंचविसावा वाढदिवस साजरा होतो आहे. पण शेतकरी संघटनेचा पन्नासावाच नव्हे तर शंभरीचाही वाढदिवस होणार आहे. त्यावेळी जी स्मरणिका काढली जाईल तिचे शीर्षक असेल 'शेतकरी संघटनेची पहिली शंभर वर्षे' " (शेतकरी संघटक : २१ नोव्हेंबर २००५).शेतकरी संघटना पंचवीस-तीस नव्हे, शेकडो वर्षे चालत राहणार आहे. शेतकरी संघटनेची सुरुवात शेतीमालाच्या भावाने झाली, शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरिता झाली. शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे याकरिता झाली; पण ती सुरुवात होती. शेतकरी संघटनेचे बियाणे जे आहे ते केवळ भाव मिळवणारे किंवा कर्जमुक्ती मिळवणारे नाही, प्रत्येक माणसाला सन्मानाने

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २११