पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



रुप्याचा दिवस म्या आनंदे पाहिला



 शेतकरी संघटनेच्या या रौप्यमहोत्सव मेळाव्याला महाराष्ट्रभरातून जमलेल्या या जनसागरात वीस-पंचवीस वर्षांच्या तरुणांची उपस्थिती मोठी लक्षणीय आहे. याचा अर्थ असा की, शेतकरी संघटना पंचवीस वर्षांनी म्हातारी झाली नसून ती पंचवीस वर्षांची तरुण झाली आहे. 'सोनियाचा दिवस मी पहिला' असे म्हणतात, पण हा सोन्याचा दिवस नसला तरी रौप्यमहोत्सवाचा दिवस असल्याने हा 'रूप्याचा दिवस मी आनंदाने पाहिला' असे म्हणू शकतो. असे भाग्य लाभल्यानंतर परमेश्वराचे आभार मानायचे असतात; पण तुम्ही शेतकरीच माझे परमेश्वर आहात म्हणून मी तुमचेच आभार मानतो.
 इथे उभे राहिल्याबरोबर असे वाटले, की आज हा सोहळा पहायला काहीजण असायला हवे होते. सर्वप्रथम आठवण होते ती माझी सहचारिणी, माझ्या दोन मुलींची आई लीला हिची. ती जर आजचे हे चित्र पाहाती तर शेतकऱ्यांच्या कामाकरिता मी संसाराकडे जे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे तिला जे सोसावे लागले त्याचे सार्थक झाले अशी तिची खात्री पटली असती. आज इथे बाबूलाल परदेशी असायला हवे होते. साप्ताहिक 'वारकरी'चे संपादक. दर शनिवारी अंक काढायचा म्हणजे मी गुरुवार-शुक्रवारी पुण्याहून पहाटे चाकणला येत असे. बाबूलालच्या दारासमोर उभा राहून हाका मारल्या की ते बाहेर येऊन म्हणत, 'अरे, आज अंक काढायचा, ना?' मग आम्ही दोघे एक खिळे जुळविणारा बरोबर घेऊन त्यांच्या छापखान्यात जात असू. एकीकडे मी मजकूर लिहीत बसे आणि आत जुळारी खिळे जुळवत असे. कधीकधी काही अडचण आल्यास सगळा मजकूर घेऊन रात्रीअपरात्री पुण्यास जाऊन कोणत्यातरी गल्लीबोळातल्या छापखान्यात जाऊन रात्रभर बसून अंक तयार करीत असू. आज, आमचे चाकणचे शंकरराव वाघ हवे होते. सातवीसुद्धा पास न झालेला माणूस; पण अफाट बुद्धिमान. जेव्हाजेव्हा मनात खिन्नता घर करे, विशेषतः वर्तमानपत्रातून आंदोलनाबाबत विपर्यस्त मजकूर येत असे किंवा पुढारी आणि प्रस्थापित

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २१०