पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागा मागणार?' बाळासाहेब वगैरे जणू ऐकतील या भीतीने अगदी खालच्या आवाजातच प्रश्न विचारणार. मी हल्ली या प्रश्नाचं एकच उत्तर ठरवून टाकलं आहे.
 'किती जागा मागणार?'
 '२८८'
 'सांगलीत किती मागणार?'
 'सगळ्या. २८८ महाराष्ट्रात मागतो त्याअर्थी सांगलीतही सगळ्या मागणार; पण २८८ पैकी किती जागा स्वतंत्र भारत पक्षाला द्यायच्या याचा निर्णय मी बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या हाती सोपवला आहे.'
 माझी अपेक्षा अशी आहे की ज्या काँग्रेसला आम्ही शत्रू नंबर एक मानलं त्या काँग्रेसचेच लोक फोडून घ्यायचे - कारण त्यांच्याकडे गडगंज पैसा जमला आहे - आणि त्यांना शिवसेनेमध्ये किंवा भाजपमध्ये घेतले म्हणजे ते शुद्ध झाले असं म्हणून ही मंडळी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत. ते शुद्ध झाले म्हटल्याने आपल्या मनाचं समाधान होईल कदाचित्; पण नेताजी पालकरला शुद्ध करणं शक्य झालं, या काँग्रेसवाल्यांना तितकंसुद्धा शुद्ध करून घेता येणार नाही. हे लक्षात न घेतल्याने मागच्या लोकसभा निवडणुकीत, अशा तऱ्हेने शुद्ध करून घेतलेल्या उमेदवारांना लोकांनी नाकारलं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. विमानाने आले आणि एका उमेदवाराची उमेदवारी घोषित करून गेले म्हणजे तो उमेदवार जिंकून येईल असे नाही. अशा तऱ्हेचे संकुचित निर्णय केल्यामुळे आपण राष्ट्रीय निवडणूक हरलो. महाराष्ट्राची निवडणूक हरणं आपल्याला परवडणार नाही. हा जीवनमरणाचा प्रश्न आहे असं समजून सगळ्यांनी एकोप्याच्या, घरगुती भावनेने एकत्र यावं, ३ सप्टेंबरच्या आंदोलनात त्याची प्रचीती द्यावी आणि पुन्हा एकदा नव्या भारताच्या बांधणीला सुरुवात व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.

(६ ऑगस्ट २००४ - सांगली)
(शेतकरी संघटक २१ ऑगस्ट २००४)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०९