पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कार्यकर्त्यांकडे काहीही साधनं नसताना त्यांच्यात एकी झाली याचं कारण आम्ही तुरुंगातल्या भाकऱ्या एकत्र खाल्ल्या. मला भाजपा, शिवसेना आणि स्वतंत्र भारत पक्ष या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र तुरुंगात न्यायचं आहे. तर खरी आपली युती होईल.स्वभापच्या शिलेदारांना निमंत्रणाची आवश्यकताच नाही पण मी शिवसेनेच्या सैनिकांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे निमंत्रण देतो की, "शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ३ सप्टेंबरच्या 'कर्जमुक्ती' आंदोलनात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे." तुमच्याकडे मोठी ताकद आहे आमचीही संख्या कमी नाही; पण आमचे शेतकरी स्वभावाने मऊ आहेत. आंदोलन सत्याग्रहाच्या पद्धतीने करतात; त्यामुळे तुमचा आवाज जितका सरकारला कळतो तितका आमच्या आंदोलनाचा कळत नाही. युती करायची असेल तर या विषयावर आपण एकत्र येऊ या आणि मग पाहू या आपल्याविरुद्ध कोण टिकतं ते. ती खरी युती होईल.'
 आणि अशा तऱ्हेने युती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यशस्वी करून दाखवलं तर, माझी खात्री आहे की, हिंदुस्थानमध्ये गेल्या निवडणुकीत आपली एक तऱ्हेने जी पीछेहाट झाली; खुलेपणा मागणारे लोक एका अर्थाने मागे पडले; सहिष्णुता, सर्वसमावेशकता पाळणारे लोक मागे पडले आणि अर्थव्यवस्थेमध्ये जातीयवाद मांडणारे लालूप्रसाद, मुलायमसिंग यांच्यासारखी माणसं राष्ट्रीय पक्षांनासुद्धा बाजूला सारून उत्तर हिंदुस्थानात निवडून आली ही परिस्थिती दुरुस्त करण्याची एक संधी आपल्या हाती येणार आहे. तेव्हा आपलं पहिलं ध्येय महाराष्ट्र विधानसभेतून काँग्रेसला पार हटवून लावणे हे असलं पाहिजे.
 लोक विचारतात, 'तुमची युती होणार का?' मी म्हणतो, 'युती होणार यात काही शंका नाही. कारण दुसरीकडे कोठे जाणार? शरद जोशी काही कम्युनिस्टांकडे नाही जाऊ शकत.'
 ते पुढे विचारतात, 'मग, भाजप आणि शिवसेनेशी तुमचं जमतं का?'
 'थोडं जमतं, थोडं नाही. लग्न लागताना कुठे नवराबायकोचं सुद्धा सगळं जमत असतं? हळूहळू जमवून घेतात, हळूहळू शिकतात.'
 आमची युती व्हायच्या आधी बाळासाहेब ठाकरे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि संपूर्ण वीजबिलमुक्ती झाली पाहिजे अशी घोषणा करतील असं कोणाला वाटलं होतं?
 आमच्यावर त्यांचे काही संस्कार होणार आहेत आणि त्यांच्यावर आमचेही काही परिणाम होणार आहेत. युती अशीच पक्की होत जाणार.
 मग ते कुरापतखोर हलक्या आवाजात प्रश्न विचारतात, 'तुम्ही विधानसभेत किती

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०८