पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२०७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मला आता दिल्लीतच अधिक काळ राहाणं भाग असल्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये वारंवार येऊन प्रचार करणं आता शक्य होणार नाही आणि तरीसुद्धा दिल्लीला बसून मी नुसता शब्दांनी जरी निरोप दिला तरी प्रचंड ज्वालामुखीसारखं शेतकऱ्यांचं आंदोलन इथं उभं राहिलं तर राज्यसभेतल्या माझ्या शब्दाला किंमत असेल, एरवी नाही.
 येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही ३ सप्टेंबरच्या आंदोलनाला महत्त्व आहे. आम्ही युती आहे असं म्हणतो आहोत. या व्यासपीठावरसुद्धा भाजप, शिवसेना, स्वभाप, शेतकरी संघटना - सगळ्यांचे नेते छान सामोपचाराने बसले आहेत; पण चुकून जर का कोणी प्रश्न काढला की सांगलीच्या मतदारसंघाची उमेदवारी कोणाकडे जावी तर इथं लगेच भांडणं सुरू होतील. मुंबईतसुद्धा एकत्र बैठकीत 'तुमची आमची युती - जन्मोजन्मीची' अशी भाषा होते. सोफासेटवर बसायचं, चहा पिता पिता चर्चा करायची. त्यात बंधुभावाच्या गोष्टी होतात आणि तेथून उठल्यानंतर बाहेर पडले की भाषा सुरू होते की, त्यांनी आपल्याला पेचात पकडलं आणि ही ही सीट सोडवून घेतली. आपण त्यांचे पाय त्या मतदारसंघात कापले पाहिजेत' अशा तहेची जर ही युती असेल तर ती याच्यापुढे टिकू शकणार नाही.
 युती कशी असावी?
 समजा, भारतीय जनता पक्ष हा एक लाकडी ठोकळा आहे, शिवसेना हा आणखी एक लाकडी ठोकळा आहे, स्वतंत्र भारत पक्ष हाही एक छोटा लाकडी ठोकळा आहे. या तिघांना एकत्र कसं आणायचं? सध्या आपण या तीनही ठोकळ्यांना एखाद्या सुतळीने बांधून एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. सुतळीने ठोकळे एकत्र राहत नाहीत. सुतळी ढिली झाली की ठोकळे हलतात, एकमेकांवर आपटतात आणि ढील फार झाली तर ठोकळे बाजूलाही होतात आणि मग भाजप, शिवसेना आणि स्वभाप - तिघांमध्येही एकमेकांविषयी टीकात्मक उद्गार ऐकायला मिळतात. ही युती जर टिकाऊ बनवायची असेल तर काय करायला पाहिजे? तीनही ठोकळ्यांमधील अहंकार संपवून त्यांचा जर भुसा केला आणि सरसाच्या साहाय्याने एखाद्या मुशीत घालून त्यांचा एकच ठोकळा तयार केला तर ती खरी, अभेद्य युती होईल.लाकडाचं ठीक आहे, त्याचा भुसा करता येतो. माणसांचं काय करावं?
 माणसांची अभेद्य युती घडवायचं हिंदुस्थानात एक मोठं साधन आहे. श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते साधन मोठमोठ्या क्रांतिकारी लोकांनी वापरलं आहे. उष्णता देऊन मुशीत घालून एकी करण्याची सगळी कामं हिंदुस्थानात तुरुंगात झालं आहे. श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला, महात्मा गांधींची चळवळ तुरुंगात झाली. शेतकरी संघटनेच्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०७