पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाईल; 'कर्जात जन्मलो, कर्जात जगलो, कर्जातच मरणार' ही परिस्थिती एकदाची संपून जाईल; पण सरकारकडे हा विषय गेला की कर्जमुक्ती तर करायची म्हणतात पण त्याला 'जर...तर', 'जमले तर' असे फाटे फुटायला लागतात. १९९० साली नागपूरला झालेल्या आपल्या शेतकरी मेळाव्यात त्यावेळचे पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी म्हटलं होतं की 'कर्जमुक्ती करण्याचं मी वचन दिलेलं आहे. रक्कम चौदा हजार कोटीची असो की चोवीस हजार कोटीची असो; पंतप्रधानांच्या शब्दाचीसुद्धा काही किंमत आहे आणि मी कर्जमुक्ती करून दाखवणार आहे. एका पंतप्रधानाचे शब्द अमलात आले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जातून सुटका केली, पण दरडोई फक्त दहा हजार रुपयांची.
 कोणाही पुढाऱ्याचं कर्जमुक्तीचं वचन 'जेवल्याखेरीज खरं नसणाऱ्या निमंत्रणा'सारखंच असतं. कर्जमुक्तीची आश्वासनं याहीपूर्वी आपण ऐकली आहेत. ती काही पुरी झाली नाहीत. २४ लाख नोकऱ्याही मिळाल्या नाहीत आणि २४ लाख घरंही मिळाली नाहीत. आश्वासनं पुरी न होण्याचं कारण काय? याचं कारण मला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही माझ्या हातात ताकद द्याल तर मी तुम्हाला मुक्ती देऊ शकतो. यावेळी मी त्यांना आश्वासन दिलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम घ्या, सगळ्या शेतकऱ्यांना एकजूट करणारे कार्यक्रम घ्या; आम्ही तुमच्या हाताला ताकद देऊ आणि कधी नाही जमलं ते, शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करून दाखवू.
 महाराष्ट्र शासनाची याबाबतची घोषणा कदाचित् कर्जमुक्तीची नसेल. तशी नसली तर काहीतरी असेल - कर्जमुक्ती फक्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाच मिळेल, छोट्या शेतकऱ्यांनाच मिळेल, सीमांत शेतकऱ्यांनाच मिळेल; कोणाचं व्याजच माफ होईल, कोणाचं मुद्दलच माफ होईल.
 मी तुमच्यासमोर ९ ऑगस्टच्या आंदोलनाचं निमंत्रण देण्यासाठी आलो होतो. पण मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून आपण ते आंदोलन पुढे ढकलले आहे; मागे घेतलेले नाही. जर का महाराष्ट्र शासनाने संपूर्ण कर्जमुक्ती याचा अर्थ सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या व्याजासकट कर्जमुक्ती जर केली नाही तर ३ सप्टेंबर २००४ पासून सबंध राज्यामध्ये कोठेही रेल्वेगाडी चालणार नाही, कोठेही रस्त्यावरील वाहतूक चालणार नाही असं 'चक्का जाम' आंदोलन सुरू होईल. ३ सप्टेंबर हा दिवस मी अशाकरता निवडला आहे की तो संसदेच्या चालू अंदाजपत्रकी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवसाचे कामकाज सुरू होण्याच्या आत महाराष्ट्रातील सर्व वाहतूक ठप्प झाल्याच्या बातम्या संसदेच्या दारावर धडकल्या पाहिजेत. हे आंदोलन इतकं प्रभावी व्हायला हवे की भविष्यात ३ सप्टेंबर हा दिवस शेतकऱ्यांचा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०३