पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुक्तिदिन म्हणून साजरा करता आला पाहिजे.
 मी अगदी सुरुवातीला सांगलीला आलो होतो. तेव्हा आपले आकारामबापू पाटील मला म्हणाले होते की, 'साहेब, आमची अशी इच्छा आहे की तुमची हत्तीवरून मिरवणूक काढावी.' मी म्हटलं, 'हत्तीवरून मिरवणूक काढण्यात काय विशेष आहे? माझी इच्छा अशी आहे की शेतकऱ्यांसमोर मी बोलावं आणि सांगलीपासून सुरू झालेली सहकारी साखर कारखान्यांची चळवळ ही शेतकऱ्यांचा आत्मघात करणारी कशी ठरली ते सगळ्या शेतकऱ्यांना समजावून सांगावं.' ते म्हणाले, 'आमचा पहिलवानांचा भाग आहे. इकडे तुम्ही बोलले काय याच्यापेक्षा तुमची किती मोठी मिरवणूक निघाली यावर तुमचं महत्त्व लोक ठरवतात!'
 मी जे काही सांगतो ते तुम्हाला कितपत समजले हे पाहण्यासाठी मी काही तुमची लेखी किंवा तोंडी परीक्षा घेणार नाही. ३ सप्टेंबर २००४ पासून सुरू होणाऱ्या आंदोलनात किती संख्येने सांगलीतील शेतकरी कार्यकर्ते बाहेर पडतात आणि किती ताकदीने 'चक्का जाम' करतात यावरून तुमची परीक्षा होणार आहे.
 आजपर्यंत आपण अनेक आंदोलने केली. या आंदोलनामध्ये कर्जमुक्ती हा एक विषय आहे. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा विषय आहे. तो मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो.
 राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, अटलबिहारी वाजपेयी निवडून आले नाहीत याचं किती दुःख झालं आहे हे मला माहीत नाही. पण सर्वसाधारणपणे असं दिसतं की, ते निवडून आले नाहीत, आता पंतप्रधान नाहीत तेव्हा त्यांना फक्त कचऱ्याची टोपलीच दाखवायची ठेवली आहे; आजकाल त्यांचं नावसुद्धा ऐकू येत नाही. माझ्या मनावर मात्र याचा फार आघात झाला आहे आणि माझी खात्री आहे की कम्युनिस्ट आणि काँग्रेस, आणि त्यांच्याबरोबर 'लालूप्रसाद' हे भयानक मिश्रण दिल्लीमध्ये फार दिवस टिकणार नाही. याच्या पुढची निवडणूक जेव्हा येईल तेव्हा सर्व धार्मिक अतिरेकीपणा बाजूला ठेवून आर्थिक स्वातंत्र्याचा कार्यक्रम सांगणारी एक आघाडी यशस्वी होणार आहे आणि त्या लढ्याची सुरुवात लवकरच होणार आहे. कदाचित अजून सहा महिने, आठ महिने केंद्रातील सरकार दम काढीलही, पण त्याच्याही आधी महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा, लोकसभा निवडणुकीत हरलेल्या फौजेमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास तयार व्हावा अशा तहेचा कार्यक्रम करणे आवश्यक आहे.
 शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो. ज्या ठिकाणी पूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठ्या संख्येने जागा मिळत असत - मुंबईसारख्या शहरांमध्ये - तिथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या हाती लोकसभा निवडणुकीत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०४