पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


चला, हत्यारे परजून घेऊ या


 गेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये मी आवर्जून सांगत होतो की फारा वर्षांनी भारताला अटलबिहारी वाजपेयींसारखं सर्वांना सामावून घेऊन सर्वांना सांभाळून नेणारं, आपल्या पक्षातल्या अतिरेक्यांनासुद्धा थोडा वेळ थंड बसवणारं आणि स्वदेशी जागरण मंचासारख्यांचा कार्यक्रम बाजूला ठेवूनसुद्धा खुल्या व्यवस्थेला पुढे नेऊन देशाला प्रचंड आर्थिक विकासाची गती देऊन देश जागतिक आर्थिक महासत्ता बनू शकतो असा आत्मविश्वास देणारं नेतृत्व लाभलं आहे.
 हे नेतृत्व खरंच असं होतं, पण आपण असे करंटे निघालो की त्या नेतृत्वाला आपण पुन्हा सिंहासनावर बसवू शकलो नाही. मी खासदार झालो म्हणून सत्कार स्वीकारताना माझ्या मनात खंत आहे, की अटलबिहारी वाजपेयींसारखं नररत्न आमच्या हातात होतं पण त्या माणसाला आपण पुन्हा पंतप्रधान करू शकलो नाही.
 मी खासदार झालो, राज्यसभेत गेलो तेव्हापासून काय काय होतं आहे त्याचा अभ्यास करीत आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शेती हा काही विषय नाही, जसा हिंदुत्व हा माझा विषय नाही; पण त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची आणि मोफत विजेची घोषणा केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेचं ९ ऑगस्टचं आंदोलन सुरू व्हायच्या आधी मला सांगितलं की लवकरच मोफत विजेची घोषणा करतो आहोत, कृपा करून तुम्ही आंदोलन चालू करू नका. हे फक्त माझं नाही तुम्हा सर्व शेतकरी भावाबहिणींचंही यश आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. फार दिवस व्हावा व्हावा अशी इच्छा होती तो निर्णय झाला. ज्या विजेच्या बिलापोटी शेतकऱ्यांना आंध्र प्रदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करावी लागली त्या विजेच्या बिलाच्या महाराक्षसाचा अंत झाला आणि आपण विजेच्या दराच्या जाचातून सुटलो.
 माझी अपेक्षा अशी आहे की लवकरच कर्जमुक्ती संबंधीची घोषणा होईल. ती तुमच्या पूर्ण समाधानाची नसेल कदाचित. कर्जमुक्तीचा विषय आला की शेतकऱ्याच्या मनात अपेक्षा उगम पावते की आपल्या डोक्यावरचा हजारो वर्षांचा कर्जाचा बोजा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०२