पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक गोष्ट महत्त्वाची आहे. बाकीच्या वस्तूंच्या बाबतीत जगात इतरत्र तयार होणाऱ्या वस्तू चांगल्या आणि आपण त्यांची नक्कल करायची अशी स्थिती आहे. धानाच्या बाबतीत नेमकी उलट परिस्थिती आहे. हिंदुस्थानातील तांदूळ जगामध्ये एक क्रमांकावर आहे. हिंदुस्थानच्या बासमतीला तोड नाही म्हणून अमेरिकेत टेक्समती नावाने त्याची नक्कल करायला पाहतात.
 कसळ कसा आला आहे?
 देशभरात खुल्या व्यवस्थेच्या नावाने कितीही आरडाओरड झाली तरी तिला आपण थोपवू शकत नाही. तेव्हा जे अटळ आहे त्याला घाबरून मागे फिरण्याऐवजी त्याचा सामना करणे केव्हाही सन्मानाचे होईल. मागे आहे ज्या सुरक्षित व्यवस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटणारी कसाई धोरणे राबविणारी सरकारशाही. आपला देश कमकुवत राहिला, अनेक बाबतीत मागास राहिला याला कारण सरकार आहे. हे सरकार आमचे कधी काळी काही भले करील यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे, जागतिक व्यापार संघटना ही संकट नसून तिच्या रूपातून सरकारशाहीच्या पिंजऱ्यातून सुटायचा मार्ग आम्हाला दिसतो आहे. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा दिसला की वाघ जसा पुढे काय वाढून ठेवले असेल त्याचा विचार न करता बाहेर झेपावतो आणि स्वतंत्र होतो त्याप्रमाणे गुणाकाराची क्षमता बाळगणाऱ्या शेतकऱ्यांनी, विशेषतः त्यांच्या बछड्यांनी खुल्या व्यवस्थेच्या अवकाशात आपल्या बुद्धी आणि ताकदीनिशी झेप घेतली पाहिजे.
  सगळ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या मनात जो कार्यक्रम तयार होतो आहे तो काही मी तुमच्यासमोर ठेवणार नाही कारण तो कार्यक्रम मला राष्ट्रीय कृषिकार्यदलाचा अध्यक्ष म्हणून पंतप्रधानांसमोर मांडायचा आहे.
 आज धानाच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी की डोक्यावर मोठे कर्ज आहे, विजेचे बिल थकले आहे, वीज मंडळाचे लोक वीजजोडणी कापायला आले आहेत. आज रात्री जगायचे कसे इथपासून सुरुवात करायची आहे. काही काळामध्ये, सहा महिन्यांमध्ये, वर्षभरात, पाच वर्षात मनुष्य म्हणून सन्मानाने जगता येईल अशी स्थिती कशी काय आणायची हा आपल्यापुढील प्रश्न आहे.
 देशाच्या संपूर्ण कृषिकार्यक्षेत्रालाच हा आजार झाला आहे. त्यावर औषध सुचवायला म्हणून पंतप्रधानांनी दिल्लीला बोलावले आहे. त्याच धर्तीवर तुम्हा धानउत्पादकांना मी औषधयोजना सांगणार आहे.
 पहिले औषध : तुमच्याकडे वीज मंडळाचा मनुष्य वीज कापायला आला तर त्याला सांगायचे, 'तुमचे मंडळ सध्या घाट्यात आहे काय? आम्ही केव्हाचेच घाट्यात आहोत, तुझ्या सरकारने उणे सबसिडीने सालोसाल लुटल्यामुळे. एका

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८७