पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंदुस्थानभरच्या शेतकऱ्यांना एकत्रितपणे द्यावी लागेल.
 आपण लढाई सुरू केली तर तुम्ही तुरुंगात जायला तयार आहात, मीही तुरुंगात जायला तयार आहे हे खरे आहे. पण एखादे वर्ष लढाई द्यायला चांगले असते. यंदाचे वर्ष कसे आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये गेल्या वर्षीचे खरेदी केलेले धान अजून गोदामात शिल्लक आहे. हिंदुस्थानात अन्नाचा दुष्काळ होता म्हणता म्हणता इतके उदंड धान्य झाले आहे की त्याला बाजारपेठ उपलब्ध नाही. गोदामे भरली आहेत म्हणून सरकारी खरेदी यंत्रणा आता धान घ्यायला कां कू करीत आहे. त्याच गोदामांमध्ये दोन महिन्यांच्या आत गहू भरावा लागणार आहे. तो कोठे ठेवावा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. लढाई लढवायची असेल तर आपली बाजूही भक्कम असली पाहिजे. तुम्ही जर म्हणालात की आम्ही पाहिजे तितके धान आज पिकवू आणि त्या सगळ्या धानाला आम्ही सांगतो तितका भाव मिळायला पाहिजे तर मिळू शकतो, नाही असे नाही. पण काम तितकं कठीण. जन्मभर तुमच्या धानाला भाव मिळावा, तुमच्या मुलांनी पिकवलेल्या धानाला भाव मिळावा, नातवांनीही पिकविलेल्या धानाला भाव मिळावा अशी जर तुमची अपेक्षा असेल तर तुम्हाला यंदा नाही तरी या आयुष्यामध्ये, या पिढीमध्ये एकदोनदा तरी माझे ऐकायला लागेल आणि आंध्रातल्या शेतकऱ्यांनी जसे ठरवले की तंबाखूला जर इतका कमी भाव मिळत असेल तर आम्ही एकदोन वर्ष तंबाखू पिकवतच नाही, तसे तुम्हाला धान्याच्या बाबतीत करावे लागेल. नोकरदारांचे पाहा. ते जे मागतात ते मिळते. कारण, देत नाही म्हटले तर ते लगेच संपावर जातात. एखाददुसऱ्या वर्षी घरात वापरायला लागतात तेवढी धानाची पोती बाजूला ठेवा आणि नवीन धान पिकवायचेच नाही असे ठरवा. घरात धानाची पोती ठेवली आहेत त्यावर वर्षभर गुजराण सहज होऊ शकेल अशी तयारी ठेवली तरच या लढाईत जिंकायची शक्यता आहे.
 या कार्यक्रमासाठी कसून तयारी करावी लागेल. धानाचा शेतकरी लहान लहान गावांमध्ये विखुरलेला, गावाला जायला रस्ता नाही, गावात वीज नाही, टेलिफोन नाही, एकमेकांशी संपर्क साधायला इतर काही साधन नाही अशा अवस्थेत सगळ्यांना एकत्र करणे जमायला हवे. एकएक काडी मोडता येते, सात काड्या एकत्र झाल्या तर त्यांना मोडता येत नाही हे लक्षात घेतले आणि सगळ्या राज्यांतील धानाचे शेतकरी एकत्र आले तर आपले आपल्या मुलाबाळांचे, नातवंडांचे भविष्य चांगले असेल.
 काळ फार कठीण आहे. आपण मागासलेले आहोत. जगभरची बाजारपेठ खुली होते आहे. जगाच्या बाजारपेठेतसुद्धा भारतातील धान शेतकऱ्यांच्या दृष्टीने

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८६