पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्हाला आणि मला उचलून तुरुंगात टाकील. त्यातही अडचण काहीच नाही. तुरुंगात फक्त पहिल्यांदा जाताना भीती वाटेल. एकदा तुरुंगात गेले की आपल्या महिला आघाडीच्या बायासुद्धा म्हणतात, 'तुरुंगात, माहेरीसुद्धा जगायला मिळत नाही इतकं चांगलं जगायला मिळतं. माहेरी गेलं तर भावजयीच्या धाकानं म्हणा ममतेमुळे म्हणा, थोडी भाजीतरी निवडायला लागते, एखाददुसरं काम करायला लागतं. तुरुंगात तसं काही नाही. सकाळी उठल्या उठल्या चहा येतो, पेज येते, दुपारी भाकरी येते. आपल्या घरी आपण थोडंच पंचपक्वान्नं खातो? आपणही भाकरीच खातो. तेव्हा तुरुंगाला काय भ्यायचं.' तेव्हा आतासुद्धा जर का आपण ठरवले की धानाला भाव भेटेपर्यंत आंदोलन करायचे, तोपर्यंत घरी परतायचे नाही तर तुम्हा सर्वांना ठेवण्याइतके तुरुंग शासनाकडे नाहीत. हे मी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात बोलत होतो आणि आजही बोलत आहे. फरक एवढाच आहे की त्यावेळी मी फक्त शेतकरी होतो, फारतर शेतकरी संघटनेचा नेता होतो; आज पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून दिल्लीला मंत्रिपदाची जागा घेतलेला मी सांगतो आहे की धानाच्या भावाकरिता, गरज पडली तर तुमच्याबरोबर तुरुंगात यायला तयार आहे.
 पण नुसते तुरुंगात जाण्यानेही काही काम होईल असे नाही. कारण पुढारी आणि प्रशासन हल्ली इतके कोडगे झाले आहेत की तुम्ही तुरुंगात जातो म्हणालात तर म्हणतील, 'जा, जाऊन बसा.' त्यांना हलवण्यासाठी असा कुठेतरी चिमटा काढावा लागतो की त्यामुळे त्यांचे आसन हलायला लागेल. तेव्हा धान शेतकऱ्यांचे आंदोलन करायचे म्हटले तर बाजारामध्ये धान जाता कामा नये, लोकांच्या ताटामध्ये भात पडता कामा नये अशी परिस्थिती तयार करता आली तर ते यशस्वी होईल.
 शेतकरी संघटनेने पहिले आंदोलन केले ते कांद्याचे. कांदा हाच विषय का घेतला? सगळ्या हिंदुस्थानात जो कांदा पिकतो त्यातील ४०% एकट्या महाराष्ट्रात आणि त्यातील ४०% कांदा पुणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांत पिकतो. या दोन जिल्ह्यांनी कांदे बंद केले तर संपूर्ण हिंदुस्थानात कांद्याचे भाव ५ रुपये, १० रुपये ते अगदी ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत चढतात आणि मग पंतप्रधानांची खुर्चीसुद्धा डळमळायला लागते. मागच्या वर्षी लासलगावच्या कांदा उत्पादकांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला गेले तर त्यांना त्यांनी अगत्याने आणि अग्रक्रमाने भेट दिली आणि म्हणाले, 'तुम्ही कांदा उत्पादक म्हणजे मोठे जबरदस्त आहात. तुम्हाला आम्ही फार घाबरतो. तुमच्यामुळे आमची पाच राज्यांतील सरकारे पडली.' अशा तऱ्हेने कांदा थांबवता येतो इतकी ताकद शेतकरी संघटनेकडे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८३