पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होती म्हणून सुरुवातीच्या काळात संघटनेने फक्त कांद्याचाच लढा सुरू केला आणि जिंकला.
 मग शेतकरी संघटनेने उसाचा प्रश्न हाती घेतला. कारण साखरेचेही गणित कांद्यासारखेच आहे. महाराष्ट्राचा हिंदुस्थानातील साखरेचा वाटा असाच परिणामकारक मोठा आहे. म्हणून नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा अशा तीनचार जिल्ह्यांत ऊस कारखान्यांकडे जायचा थांबला तर सगळ्या देशाच्या (साखर)नाड्या आखडतात. हे लक्षात घेऊन तीनचार जिल्ह्यांच्या ताकदीवर ऊसआंदोलन यशस्वी होऊ शकले.
 ज्वारीचे आंदोलन असे होईल का? ज्वारीचे आंदोलन करायचे असेल तर संघटना किती मोठी पाहिजे? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या चारही राज्यांमध्ये पंधरावीस टक्के ज्वारी तयार होते. तेव्हा, आंदोलनासाठी या चारही राज्यांत संघटना मजबूत असल्याशिवाय आंदोलन उभे करून काही उपयोग होणार नाही.
 धानाची परिस्थिती तर त्याहून बिकट. हिंदुस्थानात धान न घेणाऱ्या घरी भात खाल्ला जातो त्याचा तांदूळ प्रामुख्याने पंजाबमध्ये पैदा झालेला असतो. पंजाबचे शेतकरी सगळ्यात जास्त धान पिकवतात, पण स्वतः भात खात नाहीत. हरियाणातही धान पिकते आणि तेथूनही तांदुळाचा पुरवठा देशभर होतो. म्हणजे, धानाच्या भावाचे आंदोलन करायचे तर त्यात पंजाबचे किसान हवेत, हरियाणाचेही हवेत, ओरिसा, बंगाल, आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील शेतकरीही त्यात पाहिजेत. महाराष्ट्रातसुद्धा भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या बरोबरीने कोकणातील शेतकरी आंदोलनात उतरावे लागतील तरच धानाच्या भावाच्या आंदोलनात कांदा-उसाच्या आंदोलनासारखी परिणामकारकता येऊ शकेल. आपली संघटना एवढी मोठी असती तर धानाचे आंदोलन करता आले असते; पण संघटना नाही म्हणून आंदोलन नाही आणि आंदोलन नाही म्हणून संघटना नाही अशा चक्रात धानाचा शेतकरी अडकला होता. आज केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील किमान दहा राज्यांत शेतकरी संघटनेची ताकद तयार झाली आहे आणि त्या ताकदीच्या भरोशावर शेतकरी संघटना एका अर्थी माहेरी आली आहे, धानाच्या शेतकऱ्यांसाठी केलेला निश्चय पुरा करण्यासाठी धानाचा प्रश्न हाती घेऊन पुढे आली. आता धानाच्या शेतकऱ्यांनी जागे राहून लढायची तयारी ठेवली पाहिजे.
 २ ऑक्टोबर, २००० या गांधी जयंतीच्या दिवशी मी हरियाणामध्ये पानिपतला गेलो. तिथे यंदा पहिली धानाची लढाई झाली. त्यांच्याकडील तांदूळ म्हणजे बासमतीसारखा चांगला लांबसडक. शेतकऱ्यांनी धान पिकवला, बाजारात आणला

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८४