पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाग पहिल्यापासून प्रसिद्ध आहे तो वरी, नागली आणि भात पिकविण्याकरिता. माझ्या शेतामध्ये भाताच्या पाच वावरांपैकी एक वावर असे आहे की त्या वावरातील आंबेमोहोर धानाच्या सुगंधाने या वावरात वाघीण येऊन बसे अशी जुन्या काळची आख्यायिका वृद्ध शेतकरी सांगतात. मावळाच्या भामनहर खोऱ्यातील शेतकरी अजूनही सांगतात की आमच्या भागात जो तांदूळ पिकतो त्यात स्निग्धांश इतका की त्याच्या पेजेमध्ये वात लावली तर ती तेवत राहते. इतक्या महत्त्वाचा भात पिकविणारा मी शेतकरी आहे.
 मी कांद्याचे आंदोलन केले, उसाचे केले, कापसाचे केले, तंबाखूचे केले, अगदी पंजाबमध्ये जाऊन गव्हाचे आंदोलन केले आणि धानाकडे लक्ष दिले नाही असे होणे शक्य आहे का? या धान परिषदेच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की शेतकरी संघटनेच्या संभवाच्या काळात मावळातील खोऱ्यांमध्ये फिरताना, गावागावांमध्ये जाऊन पिंपळाच्याखाली पारावर, देवळांच्या ओट्यांवर बसून शेतकऱ्यांची बोलताना प्रामुख्याने जी चर्चा व्हायची ती धान शेतकऱ्यांच्या हलाखीबद्दल. त्यावेळी आतासारखी माणसे जात नसत; कोणी बोलावणेही धाडत नसे. आपणच बळेबळे जायचे; पारावर, ओट्यावर बसायचे, शेतकऱ्यांना हाका मारून बोलवायचे आणि पाचदहा लोक जमा झाले की त्यांना प्रश्न विचारून बोलते करायचे; अशी चर्चा होत असे.
 त्या चर्चांमध्ये माझ्या लक्षात आले की सगळ्याच शेतकऱ्यांना दुःख आहे, सुखी शेतकरी अशी गोष्ट हिंदुस्थानात तरी अस्तित्वात नाही; पण त्यातल्या त्यात सर्वांत जास्त दुःख धान उत्पादक शेतकऱ्यांचे आहे. कारण, धानाची शेती मुळात कष्टदायक. घोटाघोटा पाण्यामध्ये उभे राहायचे – रोपे लावण्यापासून ते बेणणीकापणीपर्यंत – आणि त्या चिखलामध्ये असलेला एखादा जुना मुरलेला काटा भिजलेल्या पायात रुतला म्हणजे काय जाणीव होते ती उसाच्या शेतकऱ्यांना कधी कळायची नाही. इतके सोसूनसुद्धा धान शेतकरीच सगळ्यात दरिद्री राहतो. त्यावेळी मी निश्चय केला की एक दिवस धानाचा शेतकरीसुद्धा हिंदुस्थानात सुखाने आणि सन्मानाने जगू लागेल यासाठी आयुष्यभर झटेन. हा निश्चय त्यावेळी केला, तो पुरा करण्याच्या कामाची सुरुवात आज होते आहे - रामटेकला जमलेल्या या धानउत्पादकांच्या मदतीने आणि साक्षीने.
 इतके दिवस हे काम का सुरू झाले नाही? आंदोलन करायचे झाले तर काय लागते? पहिली गोष्ट लोकांचा पाठिंबा. आज पहिल्यांदा इतक्या संख्येने धानाचा शेतकरी फक्त धानाच्या प्रश्नासाठी एकत्र झाले आहेत. आपण सर्वांनी ठरवले की आंदोलन करून धानाला भाव मिळवायचाच तर सरकार फार फार तर

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८२